विद्यापीठात पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त करा; युवासेनेचा विद्यापीठ प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
By उज्वल भालेकर | Published: January 24, 2024 07:20 PM2024-01-24T19:20:21+5:302024-01-24T19:20:31+5:30
विद्यापीठाने पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त न केल्यास युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी देशातील सर्वच विद्यापीठांना लोकपाल व विद्यार्थी तक्रार निवारण समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु, एक वर्ष उलटूनही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये लोकपाल नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने १७ जानेवारी रोजी विद्यापीठाला डिफॉल्टर यादीत टाकले आहे. त्यामुळे विद्यापीठाने पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त न केल्यास युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदनही बुधवारी कुलसचिव तुषार देशमुख यांना दिले आहे.
विद्यापीठांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी व नसलेली प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा यावर तोडगा म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने ११ एप्रिल २०२३ रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी देशातील सर्व विद्यापीठांना लोकपाल व विद्यार्थी तक्रार निवारण समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. परंतु, विद्यापीठाने अजूनही लोकपाल नियुक्त केले नाहीत. याबद्दल युवासेनेने जाब विचारला. विद्यापीठ प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे. यावेळी युवा सेना महाविद्यालयीन कक्षाच्या टीमने विद्यापीठ प्रशासनास पंधरा दिवसांच्या आत विद्यापीठांमध्ये लोकपाल नियुक्त करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
पंधरा दिवसांनंतरही लोकपाल नियुक्त न झाल्यास शिवसेना स्टाइल आंदोलनाचा इशारा युवासेना कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी युवासेना शहरप्रमुख योगेश सोळंके, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश नवरखेडे, उपजिल्हाप्रमुख पार्थ हरमकर, उपशहर प्रमुख भाविक कांबळे, साहिल ढोले, वेदांत दांडगे, तेजस गडलिंग, आयुष पाटील, विशाल दांडेकर, गौरव पावडे, अनिकेत चावरे, आयुष कुरळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.