जिल्हा परिषद परीक्षेचे तिसऱ्या टप्याचे वेळापत्रक जाहीर; १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान पेपर
By जितेंद्र दखने | Published: October 25, 2023 06:36 PM2023-10-25T18:36:47+5:302023-10-25T18:37:12+5:30
जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे वारंवार बदलणारे वेळापत्रक पुन्हा एकदा जाहीर झाले आहे.
अमरावती : जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे वारंवार बदलणारे वेळापत्रक पुन्हा एकदा जाहीर झाले आहे. मात्र, यावेळी १ ते ६ नोव्हेंबर असे तीन दिवसाचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.यात ६ संवर्गातील रिक्त पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. १२ हजार ६५१ उमेदवार या पदासाठी परीक्षार्थी आहेत.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ मधील पदभरतीसाठी सध्या राज्यभर परीक्षा सुरू आहे. त्यातील काही पदांसाठी परीक्षा झाल्यानंतर मध्येच पुढील परीक्षेचे वेळापत्रक रद्द करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील १५ ते १७ ॲाक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार परीक्षा पार पडली. परंतु अचानक पुढील परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे कंपनीने कळविल्याने विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या विविध संवर्गातील ६५३ पदांसाठी गत ७ ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू झाली होती. या परीक्षेच्या दोन टप्प्यात ३० संवर्गासाठी ही परीक्षा होत आहे.
दोन टप्प्यात १४ संवर्गासाठी परीक्षा पार पडली. ही सलग परीक्षा घेताना कंपनीचे नाकीनऊ आले असून प्रत्येक टप्प्यावर काहीतरी तांत्रिक कारण देत परीक्षेचा खोळंबा येत आहे. अशातच आता तिसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक कंपनीने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार १ आणि २ नोव्हेंबरला व त्यानंतर ६ नाेव्हेंबरला परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरला ज्युनिअर मेकॅनिक, मेकॅनिक व कनिष्ठ आरेखक तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ,विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी २ नाेव्हेबर रोजी तर सहा नोव्हेंबरला विस्तार अधिकारी पंचायत या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या तीन पदांसाठी १२ हजार ६५२ परीक्षार्थी आहेत. दोन सत्रात ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.