जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा ऑनलाइनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:29+5:302021-08-29T04:15:29+5:30
अमरावती : कोरोनामुळे गत वर्षभरापासून सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आलेत. यामुळे सभा, बैठकांनाही मनाई करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा ...
अमरावती : कोरोनामुळे गत वर्षभरापासून सर्वच कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आलेत. यामुळे सभा, बैठकांनाही मनाई करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑफलाइन होऊ शकली नाही. आता येत्या ३ सप्टेंबर रोजी होऊ घातलेली सर्वसाधारण सभाही ऑनलाइनच होणार आहे. त्यामुळे सदस्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या बहुतांश सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यावर सदस्य समाधानी नाहीत; परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता यावर तोडगा निघाला नाही. अशातच आता कोरोनाचा संसर्ग ओसरल्यामुळे लावण्यात आलेल्या कडक निर्बंधातही बरीच शिथिलता देण्यात आली आहे. परिणामी, परिस्थितीही पूर्वपदावर येत आहे, असे असताना आगामी होऊ घातलेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑनलाइनच घेतली जाणार असल्याने अनेक सदस्य या निर्णयावर नाराज आहेत. त्यामुळे आतातरी आगामी आमसभा ऑफलाइन व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांमधून होत आहे.
बॉक्स
आमसभेच्या पटलावर १३ विषय
जिल्हा परिषदेची दर तीन महिन्यांतून एकदा होणारी आमसभा शुक्रवार ३ सप्टेबर रोजी होत आहे. या सभेच्या पटलावर एकूण १३ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, पंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा आणि शासनाकडून विविध विभागांना प्राप्त होणारे निर्णय, परिपत्रकांचे वाचन, अशा विषयांचा समावेश आहे.