जिल्हा परिषदेच्या सभा पुन्हा ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:36 AM2021-02-20T04:36:08+5:302021-02-20T04:36:08+5:30
अमरावती : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सभा पुन्हा ऑनलाईन होत ...
अमरावती : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सभा पुन्हा ऑनलाईन होत आहेत. २२ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा, तर २६ ला स्थायी व व्यवस्थापन समिती सभा होणार आहे.
तिन्ही सभा ऑनलाईनच असल्याने नोटीस व इतर कागदपत्रे सदस्यांपर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहचवली जात आहेत. गतवर्षापासून कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व सभा ऑनलाईनच घेण्यात आल्या. ऑनलाइन सभांमुळे नागरिकांचे मुद्दे प्रभावीपणे मांडता येत नाहीत. सदस्यांनी मांडलेले प्रश्न पीठासीन सभापतीपर्यंत नीट पोहोचण्यास अडचणी येत असल्याची सार्वत्रिक ओरड होती. या तक्रारी आणि दरम्यानच्या काळात नियंत्रित झालेल्या कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या सभा ऑफलाईन घेण्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाने जारी केले होते. मात्र, पुन्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे आता ऑनलाईन सभा घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दर तीन महिन्यांनी एकदा घेतली जाते. या सभेला सदस्यांसह पंचायत समितीचे सभापती, विविध विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याची मुभा असते. यामुळे जिल्ह्याचे प्रतिबिंब या सभेमध्ये उमटते. साधक-बाधक चर्चा आणि आवश्यक विकासात्मक निर्णय असे या सभेचे स्वरूप असते. परिणामी या सभेला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु, कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता, आता ही इच्छा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत पूर्ण होणार नाही. सभांचे कामकाज पीठासीन सभापती या नात्याने जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख हे सांभाळणार आहेत.
बॉक्स
येत्या आठवडाभरात तीन सभा
२२ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर २६ फेब्रुवारीला स्थायी समितीची सभा दुपारी १ वाजता आणि याच दिवशी दुपारी ३ वाजता जलसंधारण समितीची सभा पार पडणार आहेत.