कोरोनामुक्त गावांसाठी जिल्हा परिषद सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:19+5:302021-06-05T04:10:19+5:30
अमरावती : ग्रामीण भाग लवकर कोरोनामुक्त व्हावा, या उद्देशाने गावांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या कोरोनामुक्त गाव ...
अमरावती : ग्रामीण भाग लवकर कोरोनामुक्त व्हावा, या उद्देशाने गावांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने कोरोनामुक्त गाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात गटविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. यासाठी आतापर्यंत कोरोनात चांगली कामगिरी करणाऱ्या विविध तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी प्रभावीपणे कोरोनामुक्त गावांसाठी लक्षपूर्वक काम करावे . जिल्ह्यातील प्रत्येक गावांनी कोरोनामुक्त गाव स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले आहे. आजपर्यंत शासनाने जाहीर केलेल्या नवीन योजना प्रभावीपणे राबविण्यात जिल्हा परिषद मागे राहत नाही. प्रत्येक अभियानात जिल्हा परिषदमार्फत प्रभावीपणे कामे व योजना राबविल्या जातात. ग्रामविकास विभागाच्यावतीने नुकतीच कोरोनामुक्त गाव पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्याची तयारी जिल्हा परिषद सुरू केली आहे. कोरोनाच्या पहिला लाटेपासूनच काही गावे अतिशय चांगली काम करत आहेत. अनेक गावांनी आपल्या गावाच्या वेशीवर कोरोनाला रोखले आहे. अशा गावांची माहिती घेण्याच्या सूचना बीडीओंना दिल्या आहेत. प्रत्येक गावांनी पुरस्कारासाठी ज्या २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे, त्यावर फोकस करावा आणि गाव कोरोनामुक्त कसे राहील, यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही ग्रामपंचायतींना तसेच ग्राम दक्षता समित्यांना दिल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लागली आहे.