जिल्हा परिषद शाळेचा घंटा आता तरी वाजवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:17 AM2021-09-17T04:17:34+5:302021-09-17T04:17:34+5:30
अमरावती : कोरोना नियम शिथिल झाल्याने अनेक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. बऱ्याच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्याही शून्यावर ...
अमरावती : कोरोना नियम शिथिल झाल्याने अनेक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. बऱ्याच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्याही शून्यावर आली आहे. त्यामुळे आता शासनाने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागातील गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शासनाने शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.
ग्रामीण भागातील गावे कोरोनामुक्त झालीत. मध्यंतरी कोरोनामुक्त भागात शाळा सुरू करण्याच्या शासनाकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. विद्यार्थी घरी राहून आळशी झाले आहेत,तर त्यांच्यातील चिडचिडापणा वाढला आहे. बाहेर जाणे बंद असल्याने अनेक मुले लठ्ठ झाली आहेत. शाळा बंद असल्याने दिवसभर लहान मुलांचे काय करावे, असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. बाजारपेठा सण, उत्सवांना परवानगी दिली जाते. मग शिस्तीत चालणाऱ्या शाळांनाच कोरोनाची भीती का दर्शविली जात आहे, असे पालकांचे म्हणणे आहे. शाळा सुरू न झाल्याने मुलांचे बौद्धिक नुकसान होत असल्याचे शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी शासनास पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोट
शाळेत ऑनलाईनसाठी शिक्षक उपस्थित राहात आहेत. त्यानुसार शाळा सुरू केल्यास चांगलेच होणार आहे. कोरोना नियमांचे पालन करत शिस्तीत शाळा चालतील. मुलांचे बौद्धिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
-राजेश सावरकर,
राज्य प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक समिती