शिक्षण राज्यमंत्र्यांची पाठ फिरताच शाळेला टाळे; सांगा साहेब, आमची मुलं शिकवायची तरी कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 12:12 PM2021-12-21T12:12:31+5:302021-12-21T12:29:26+5:30
१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे.
अमरावती : ‘साहेब, गेल्या आठवड्यापासून शाळेला कुलूप आहे. आम्ही आमची मुलं कुठे शिकवायची? मुख्याध्यापक, शिक्षक बेपत्ता आहेत. मुलांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण’, असा प्रश्न थेट आदिवासींनी जिल्हा प्रशासन व नेत्यांना केला आहे. त्यामुळे कालपर्यंत शिक्षणाचा गंध नसल्याची ओरड असलेल्या मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे गंभीर चित्र तालुक्यातील अतिदुर्गम सिमोरी येथील शाळेच्यानिमित्ताने पुढे आले आहे.
तालुक्यातील सिमोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला आठवडाभरापासून कुलूप लागले आहे. आदिवासी विद्यार्थी दररोज शाळेला कुलूप असल्याचे पाहून परत जात असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली आहे. आठवड्यापूर्वी या परिसरात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांची कर्तव्यपूर्ती यात्रा हतरू येथे झाली. त्यानंतर शाळेला कुलूप लागले. दोन वर्षांपासून सर्व शाळा कोरोनाकाळात बंद होत्या. दि. १ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे.
कोरोनाकाळात शाळा बंद असताना पन्नास टक्के शिक्षकसुद्धा बेपत्ता होते. आता शाळा सुरू झाल्या तरी कुलूपबंद आहेत. शनिवारी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती अविनाश मेटकर यांनी हतरू सर्कलमधील शाळांना भेट दिली. त्यात सिमोरीसह काही शाळा बंद होत्या. याबाबत आता जिल्हाधिकारी वा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.
मुलांच्या शैक्षणिक ताणाला जबाबदार कोण?
अतिदुर्गम हतरू परिसरामध्ये आठवडाभरापासून शिक्षक, मुख्याध्यापक आलेले नाहीत. आमच्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न सिमोरी गावातील पालक शांताराम चिमोटे, विनोद बचले, महाजन बेठेकर, सुरेशपाल बेलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्यारी महाजन बेठेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारीत विचारला आहे.
कर्तव्यपूर्ती झाली शिक्षक कर्तव्य विसरले
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी नुकतीच आदिवासींना विविध दाखले, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अतिदुर्गम भागापर्यंत कर्तव्यपूर्ती यात्रा काढली. त्याला प्रशासनातील अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची उपस्थिती होती आणि आठवडा होत नाही तोच शाळांना कुलूप लागले. क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी गायब झाल्याचे चित्र आहे. त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी आदिवासींनी केली.
सीमोरी येथील शाळेला कुलूप असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात सोमवारी केंद्रप्रमुखांना तत्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
संदीप बोडके, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा