जिल्हा परिषद उपाध्यक्षांची भातकुली बीडीओंना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:32 PM2018-03-07T23:32:08+5:302018-03-07T23:32:08+5:30
भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : भातकुली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर पाटील यांना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना घडली. दरम्यान, संतप्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविला. याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
भातकुली पंचायत समितीमध्ये कृषिविकास अधिकारी पदावर कार्यरत एका महिला कर्मचाºयाला असमाधानकारक कामकाजाबाबत बीडीओंनी कार्यमुक्त केले. आकृतिबंधानुसार कृषिविस्तार अधिकाºयाचे पद नसल्यामुळे या कर्मचाऱ्याला कृषी विभागाकडून ७ मार्च रोजी नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. परंतु, त्यांना रुजू करून घेण्यास बीडीओंनी नकार दिला. हा प्रकार सदर कर्मचाºयाने जि.प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना सांगताच त्यांनी बीडीओ सागर पाटील यांचे कार्यालय गाठले. ही प्रशासकीय कारवाई असल्याचे बीडीओंनी सांगितले. मात्र, ढोमणे हे महिला कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्यासाठी आग्रही होते. बीडीओ भूमिकेवर ठाम राहिल्याने उपाध्यक्ष संतप्त झाले आणि त्यांनी पाटील यांना मारहाण केली. कार्यालयातील खुर्च्यांची फेकफाक करीत अश्लील शिवीगाळ केली. घटनेची तक्रार पाटील यांनी गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे.
कर्मचाऱ्यांचे काम बंद
भातकुली पंचायत समितीत या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन गटविकास अधिकाऱ्याच्या दालनाकडे धाव घेतली आणि काम बंद करून घटनेचा निषेध नोंदविला.
महिला कृषिविस्तार अधिकाऱ्यास गटविकास अधिकाऱ्याने उद्धट वागणूक दिली. त्यामुळे आमचा शाब्दिक वाद झाला. मात्र, मारहाण किंवा शिवीगाळ केली नाही.
- दत्ता ढोमणे,
उपाध्यक्ष, जिल्हा परिषद