जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:08 AM2018-03-09T00:08:51+5:302018-03-09T00:08:51+5:30
भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली. उपाध्यक्षांना जि.प. अध्यक्षांच्या कक्षातून दुपारी ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
ढोमणे यांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी पोलिसांना विनंती केली. मात्र, गाडगेनगर पोलीस त्यांच्या अटकेवर ठाम राहिल्याने काही शिवसैनिकांसोबत पोलिसांची शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान बीडीओ सागर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, शहरप्रमुख प्रशांत वानखडे, सहसंपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, आशिष धर्माळे यांनी गाडगेनगर ठाण्यात ठिय्या दिला. चर्चेअंती पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा की कसे, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा पवित्रा गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी मागे फिरलेत.
ढोमणे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री भादंविच्या कलम ३५३, ५०४, ५०६, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बीडीओ सागर पाटील यांना त्यांच्या कार्यालयात शिरून मारल्याचा आरोप ढोमणे यांच्यावर आहे. गुरुवारी महसूल अधिकारी कर्मचाºयांनी पाटील यांच्या समर्थनार्थ बंद पुकारल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव आला होता.
जिल्हा परिषदेत खळबळ
जि.प. उपाध्यक्षांना अटक करण्यासाठी गुरुवारी पोलीस जिल्हा परिषदेत दाखल झाले. याची कुणकुण शिवसेना पदाधिकाऱ्यांना लागताच त्यांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. दत्ता ढोमणे यांना अटक करण्यास सुरुवातीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांनी हुज्जत घातली. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान बीडीओंनी ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सुधीर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
जि.प.उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने एमसीआर सुनावला. शिवसैनिकांच्या तक्रारीवरुन बीडीओंविरुद्ध गुन्हा नोंदविलेला नाही.
- मनीष ठाकरे,
ठाणेदार, गाडगेनगर