'जिंदगी ना मिलेंगी दोबारा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:46+5:302021-09-26T04:13:46+5:30
अमरावती : 'जिंदगी ना मिलेंगी दोबारा' या हिंदी म्हणीप्रमाणेच सलीम इब्राहीम खान या व्यक्तीचे म्हणणे आहे. सलीम हे एका ...
अमरावती : 'जिंदगी ना मिलेंगी दोबारा' या हिंदी म्हणीप्रमाणेच सलीम इब्राहीम खान या व्यक्तीचे म्हणणे आहे. सलीम हे एका पायाने अपंग आहेत. तरीही ते ऑटो चालवितात. सलीम हे स्थानिक बेलपुरा भागातील मूळचे रहिवासी. ते अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाहून ऑटो चालवतात.
परमेश्वराने आपल्याला एवढे सुंदर जीवन दिले ते आपण कुठल्याही तक्रारीशिवाय जगले पाहिजे. संकटे हे येणारच आहेत. त्यांना पार करत आपण पुढे गेलो पाहिजे, असे सलीम सांगतात. तीन वर्षांपूर्वी ते एका मित्रासोबत लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बाहेरगावी गेले. परत येताना त्यांचा अपघात झाला. त्यात त्यांच्या मित्राचा मृत्यू झाला आणि सलीमचा अर्धा पाय कापवा लागला. डाव्या हाताची दोन बाेटे निकामी झाली. कमरेला व्याधी झाली. मित्राचे अपघाती निधन झाल्याचे शल्य त्यांच्या मनात अजूनही आहे. मात्र, सलीम त्यातून सावरले. पुन्हा आपल्या व्यवसायाकडे लागले. रोज सकाळी ते ऑटो बस स्थानकावर आणतात व तेथून प्रवाशांची ने-आण करतात. इतर ऑटोचालक त्यांना मदत करतात. यात व्यवसायात त्यांना कुठल्याच जाती-धर्माची बंधने येत नाही. त्यांच्या ऑटोत कुठलाही बिघाड झाल्यास इतर कामे साेडून ऑटोचालक त्यांच्या मदतीला येतात. याकरिता लगडा ऑटो वाला म्हणून ते बसस्थनकावर परिचित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सलीम यांच्या परिवारात त्यांची पत्नी, दोन मुले व मुलगा आहे. कुठलीही अडचण आल्यास संपर्क करता यावा म्हणून त्यांच्याकडे मोबाईल आठवणीने दिला जातो. सलीम म्हणतात,रडत बसल्याने काही होणार नाही, त्यासाठी शक्य तितके प्रयत्न करून संसार फुलविण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मुलांना शिकवायचे आहे. मुलींचे लग्नसुध्दा करायचे आहे. यासाठी मेहनत करून परिस्थितीला सामोर गेले पाहिजे, भीक मागून जीवन जगल्यापेक्षा स्वाभिमानाने जगणे शिकले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.