जि.प. अध्यक्षांनी घेतली नांदगाव पंचायत समितीची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:46 PM2017-12-21T23:46:24+5:302017-12-21T23:46:36+5:30
झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी गुरुवारी स्थानिक पंचायत समितीला आकस्मिक भेट देऊन विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी ४ कर्मचारी गैरहजर आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी गुरुवारी स्थानिक पंचायत समितीला आकस्मिक भेट देऊन विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी ४ कर्मचारी गैरहजर आढळले.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता सुलतानपूर येथील जि.प. शाळेला भेट दिली. यावेळी शिक्षक शाळेवर हजर झाले नव्हते. या दोन शिक्षकी शाळेतील शिक्षकांच्या गैरहजेरीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाल्याचे आढळले. ३९ पैकी १० विद्यार्थी हजर होते. तिसरीतील विद्यार्थ्यांना दोन अंकी बेरीजही येत नसल्याचे जि.प. अध्यक्षांना आढळून आले. आकस्मिक भेटीदरम्यान गोंडाणे यांनी रोहयो कामांची चौकशी केली. पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, नगराध्यक्ष अक्षय पारसकर, गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, गटशिक्षणाधिकारी प्रवीण खांडेकर, प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी, विजय राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
गैरहजर शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाईल. पंचायत समितीमधील चार गैरहजर कर्मचारी तसेच ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत, अशा कर्मचाºयांवर कारवाई होणार आहे.
- नितीन गोंडाणे
जि. प. अध्यक्ष