झेडपीत पुन्हा "काँग्रेस राज"

By admin | Published: April 4, 2017 12:21 AM2017-04-04T00:21:57+5:302017-04-04T00:21:57+5:30

भाजपाला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद पटकाविल्यानंतर सोमवारी चार विषय समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही ...

ZP again in "Congress Raj" | झेडपीत पुन्हा "काँग्रेस राज"

झेडपीत पुन्हा "काँग्रेस राज"

Next

विषय समिती निवडणूक : सुशीला कुकडे, वनिता पाल, जयंत देशमुख, बळवंत वानखडेंची वर्णी
अमरावती: भाजपाला बाजूला सारून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद पटकाविल्यानंतर सोमवारी चार विषय समिती सभापतीपदासाठीच्या निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आणि शिवसेना या आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला. चारपैकी दोन समित्या काँग्रेसने राखल्या, तर राष्ट्रवादी व रिपाइंलाही सत्तेत वाटा मिळाला. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या वनिता पाल, तर समाजकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशीला कुकडे यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे जयंत देशमुख आणि रिपाइंचे बळवंत वानखडे यांची विषय समिती सभापती म्हणून निवड झाली आहे. या दोघांसह उपाध्यक्षांचे खातेवाटप येत्या सर्वसाधारण सभेत केले जाणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सोमवारी चार विषय समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळी १० वाजेपासून प्रारंभ करण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस आघाडी समर्थित राष्ट्रवादीच्या समाज कल्याण सभापतीपदाचे उमेदवार सुशीला कुकडे यांनी ३३ मते प्राप्त करून विजय मिळविला. त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेचे दिनेश टेकाम यांचा ६ मतांनी पराभव केला. टेकाम यांना २६ मते मिळालीत. महिला व बालकल्याण सभापतीपदाच्या निवडणुकीत काँगेसच्या वनिता पाल यांनीही ३३ मते प्राप्त करून भाजप समर्थित राष्ट्रवादीच्या सीमा घाडगे यांचा ६ मतांनी पराभव केला.
दोन विषय सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे जयंत देशमुख यांना ३३ तर भाजपा समर्थित लढा संघटनेच्या गौरी देशमुख यांना २६ मिळालीत. दुसऱ्या विषय समिती सभापतीपदासाठी काँग्रेस युतीचे रिपाइंचे उमेदवार बळवंत वानखडे यांनाही ३३ मते मिळालीत. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या शिल्पा भलावी यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत तटस्थ भूमिका बजाविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य देवेंद्र भुयार यांनी मात्र सभापती पदासाठीच्या निवडणूक काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या बाजूने मतदान केले.
सभापती पदाच्या मतदान प्रक्रियेत ५९ सदस्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक प्रक्रिया उपजिल्हाधिकारी इब्राहिम चौधरी, सहायक अधिकारी तहसीलदार अनिरूध्द बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रमोद देशमुख, प्रकाश माहुरे, नवनाथ तायडे, विजय शेलूकर, नीलेश तालन, झेडपीचे डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे यांनी सचिवपदाची जबाबदारी सांभाळली.
झेडपीचे तख्त यापूर्वी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने विषय समिती सभापती पदासाठी पडद्यामागे राजकीय हालचाली चालविल्या होत्या. मात्र, काँग्रेस प्रारंभीपासूनच सावध पावले टाकीत असल्याने भाजपला कोणतीही राजकीय संधी देण्यास वाव मिळाला नाही. परंतु राज्यात भाजपची सत्ता असल्याने काही तरी वेगळी राजकीय खेळी होईल, ही ंिचंता काँग्रेसच्या नेत्यांना अगोदरपासून होती. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटपर्यत संभ्रमावस्था कायम असल्याचे चित्र सभागृहात अनुभवता आले. मात्र, काँग्रेसने ‘नहेले पे दहेला’ ही राजकीय खेळी करून भाजप व मित्रपक्षाला कोणतेही पद वाट्याल्या येऊ दिली नाही, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले.
सभापती पदाच्या निवडणूकीत दगा फटका होऊ नये यासाठी आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख, माजी आ. संजय बंड, केवलराम काळे, रिपाइंचे राजेंद्र गवई यांच्यासह नेते लक्ष ठेवून होते.

Web Title: ZP again in "Congress Raj"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.