जिल्हा परिषद पदभरती प्रक्रियेत खोळंबा, नियोजन कोलमडले
By जितेंद्र दखने | Published: October 20, 2023 05:59 PM2023-10-20T17:59:28+5:302023-10-20T18:00:15+5:30
वेळापत्रकाअभावी जीव टांगणीला
अमरावती :जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या पदभरतीत लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. दुसऱ्यांदा परीक्षेचे वेळापत्रक रद्द झाल्याने इच्छुक उमेदवारांचा संभ्रमावस्था आहे. नियोजित परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, पुढील वेळापत्रक प्राप्त होताच जाहीर केले जाईल असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ मधील रिक्त असलेल्या ६५३ पदांच्या भरतीसाठी जिल्ह्यासह राज्यात ७ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील ६५३ पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रारंभी ही परीक्षा ३ ऑक्टोबरपासून होणार होती. परंतु तयारी झाली नसल्याचे कारण देत ७ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू झाली. त्यानुसार पहिल्या टप्यात ७ ते ११ अशा चार दिवसांचे वेळापत्रक जाहीर झाले. यात केवळ आठ संवर्गातील परीक्षा झाली. तोपर्यत पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नव्हते. अखेर दुसऱ्या टप्प्यातील १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंतचे वेळापत्रक कंपनीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर केले.
यातील १७ ऑक्टोबरपर्यंत ६ संवर्गाकरीता परीक्षा घेण्यात आली. परंतु आता जवळपास अर्ध्या संवर्गाची परीक्षा अद्याप झाली नसतांना अचानक ही पुढील परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे परीक्षार्थी असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. उर्वरित संवर्गासाठीची परीक्षा पुढे ढकलण्या मागे तांत्रिक कारण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.