पंचायत समिती सदस्याविरुद्ध झेडपी कर्मचारी एकवटले
By admin | Published: May 20, 2017 12:46 AM2017-05-20T00:46:07+5:302017-05-20T00:46:07+5:30
मोर्शी पंचायत समितीत कार्यरत अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या सभेत शिरून पं.स. सदस्यानेच
निषेध : छपाने यांच्यावर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मोर्शी पंचायत समितीत कार्यरत अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या सभेत शिरून पं.स. सदस्यानेच अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी भाऊराव छपाने नामक सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केली आहे. शुक्रवारी जिल्हापरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पंचायत समिती सदस्याने केलेल्या या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
मोर्शी पं.स.अधिकारी व कर्मचारी काही न्यायिक मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती. भर सभेत पंचायत समिती सदस्य यांनी कुठलीही परवानगी व निमंत्रित न करता ही थेट व्यासपीठावर येऊन उपस्थित कर्मचाऱ्यांचा सभेत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप येथील जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सदस्यांनी केला. सदस्यांच्या या गैरवर्तणुकीबाबतची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पं.स. सदस्याच्या कृत्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पकडले आहे. त्यामुळे या सदस्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जिल्हापरिषद कर्मचारी युनियनने केली आहे. या निषेध आंदोलनात प्रवीण चौधरी, प्रशांत धर्माळे, संजय राठी, विजय कविटकर, नीलेश तालन, ईश्वर राठोड, लिलाधर नांदणे, प्रज्ज्वल घोम, मनीष गिरी, संजय खडसे, समीर लेंधे, निखिल माहुरे, शिल्पा काळमेघ, संजय खारकर, घोटेकर, सुदेश तोटेवारसह अन्य कर्मचारी समाभागी झाले होते.