झेडपी, पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:15 AM2021-02-11T04:15:14+5:302021-02-11T04:15:14+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या तीन पंचायत समितीच्या दोन रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठीच्या हालचाली ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या तीन पंचायत समितीच्या दोन रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असून, जिल्हा पातळीवर मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य बळवंत वानखडे व देवेंद्र भुयार हे जण विधानसभेच्या निवडणुकीत आमदार म्हणून विजयी झाले आहे. त्यामुळे दर्यापूर तालुक्यातील गायवाडी व वरूड तालुक्यातील बेनोडा या दोन जिल्हा परिषद सर्कलच्या जागा रिक्त आहेत. याशिवाय बांधकाम सभापती प्रियंका दगळकर यांचे अलीकडेच निधन झाल्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव झेडपी सर्कलची जागा रिक्त झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्यीय सभागृहात ५६ सदस्यच आहेत. या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक घेतली जाणार आहे. याशिवाय अमरावती पंचायत समितीतील वलगाव गणाची तसेच अचलपूर तालुक्यातील कांडली गणाची जागा रिक्त आहे. त्यामुळे या दोनही पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठीसुध्दा निवडणूक घेतली जाणार आहे. या पाचही मतदारसंघाची निवडणूक या मतदार यादीच्या आधारे घेतली जाणार आहे. या रिक्त जागांकरिता निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने यासाठीची मतदार यादी १८ फेब्रुवारीला जाहीर केली जाईल. २६ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविल्या जातील. त्यानंतर ५ मार्चला अंतिम व १० मार्चला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी घोषित केली जाईल. ही मतदार यादी जाहीर होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातही या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत.
बॉक्स
मतदार यादीनंतर निवडणूक कार्यक्रम
एरवी अंतिम मतदार यादीची घोषणा होण्याच्या दिवशी निवडणूक कार्यक्रम घोषित केला जातो आतापर्यंतच्या निवडणुका या क्रमाने झाले आहेत. त्यामुळे यावेळीही तसेच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम ५ मार्च रोजी घोषित होऊ शकतो.