लम्पीला रोखण्यासाठी झेडपीने उतरविली खातेप्रमुखांची टीम!, सीईओंचे आदेश
By जितेंद्र दखने | Published: September 17, 2022 08:46 PM2022-09-17T20:46:43+5:302022-09-17T20:47:11+5:30
१४ तालुक्यांच्या एचओडीकडे संपर्क अधिकाऱ्यांची जबाबदारी
अमरावती : जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपाययोजना म्हणून जिल्हा परिषदेने १४ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती तालुकानिहाय केली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी सीईओ अविश्यांत पंडा यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक नियंत्रण अधिनियम २००९ लागू केला आहे. जिल्ह्यात पशुधनाला संक्रमण व संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार झेडपीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण भागात पशुपालकांमध्ये जनजागृती बाधित जनावरांवर उपचार लसीकरण करण्यात येत आहे. अशातच लम्पीला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेतील १४ खातेप्रमुखांकडे तालुकानिहाय संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे. संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी यांच्यावरही तालुक्याची जबाबदारी देऊन ते यावर स्थानिक पातळीवर वॉच ठेवणार आहेत.
ॲडिशनल सीईओकडे मॉनिटरिंग
तालुका संपर्क अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नियुक्त करून त्यांच्याकडे लसींच्या साठ्याची मागणी, नियोजन व पुरवठा याची खात्री पशुधन विकास अधिकारी यांच्याकडून करावी लागणार आहे. बाधित भागात पाच किलोमीटरच्या परिघामध्ये असलेल्या गावातील पशूंचे लसीकरण करण्यासाठी सीसीची उपलब्धता, पुढील मागणी यावर लक्ष ठेवणार आहेत.या समितीला तालुक्याच्या संपर्कात राहून त्या ठिकाणी भेटी द्याव्या लागणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्याकडे १४ ही अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण, कुठले संपर्क अधिकारी ?
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक प्रीती देशमुख यांना तिवसा,डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे नांदगाव खंडेश्वर, श्रीराम कुलकर्णी अचलपूर, डॉ. कैलास घोडके धारणी, प्रवीण सिन्नारे धामणगाव रेल्वे, डीएचओ डॉ. दिलीप रणमले चिखलदरा, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे भातकुली, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख अमरावती, प्रभारी कृषी विकास अधिकारी लहुदास आडे दर्यापूर, कार्यकारी अभियंता बांधकाम विजय वाठ चांदूर रेल्वे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव मोर्शी, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) राजेंद्र सावळकर वरुड, समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर अंजनगाव सुर्जी, तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके यांना चांदूर बाजार तालुक्याची जबाबदारी साेपविली आहे.