आचारसंहितेच्या सावटात झेडपीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:50 PM2017-09-07T21:50:00+5:302017-09-07T21:50:15+5:30
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आठ आरोग्य लेखाशिर्षाखाली चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाच्या निविदा स्वीकृतीस मान्यता देण्यासाठी ......
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आठ आरोग्य लेखाशिर्षाखाली चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाच्या निविदा स्वीकृतीस मान्यता देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ८ सप्टेंबर रोजी बोलविण्यात आली आहे.
या सभेत सदर बांधकामाच्या निविदा स्वीकृतीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र आता ग्रामीण भागात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
घाटलाडकी येथील आरोग्य केंद्रासाठी ८ प्राथमिक आरोग्य केंद्र (गैरआदिवासी) यामधून इमारत बांधकामासाठी अनुदान उपलब्ध झाले आहे. ही इमारत २ कोटी८७ लाख १८ हजार रूपयांची असून इमारतीचे बांधकाम हे ५० लाखांवर असल्याने या कामांच्या निविदा स्वीकृतीस जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र याला सर्वसाधारण सभेची मान्यता नसल्याने जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निविदा स्वीकृतीस मान्यता देण्यासाठी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्याकडे विशेष सभा बोलविण्यासाठी २७ सदस्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार अध्यक्षांनी घाटलाडकी येथील आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी विशेष सभा बोलविण्याचे फर्मान प्रसासनाला सोडले होते. त्यानुसार प्रशासनाने सभेची तयारी केली. परंतु ही सभा आयोजित करताना ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली नव्हती. परंतु आता आचारसंहिता असल्याने सभेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.