झेडपी अध्यक्षांच्या दालनात भाजप कार्यकर्त्यांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:10 PM2019-07-08T23:10:04+5:302019-07-08T23:10:43+5:30
पांदण रस्त्याची न झालेली कामे, अनेक योजनांचा परत गेलेला निधी आणि भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू या घटनांना जिल्हा परिषदेचे निष्क्रिय पदाधिकारी कारणीभूत असल्याचा रोष व्यक्त करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे सोमवारी जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पांदण रस्त्याची न झालेली कामे, अनेक योजनांचा परत गेलेला निधी आणि भाजप महिला पदाधिकाऱ्याचा मृत्यू या घटनांना जिल्हा परिषदेचे निष्क्रिय पदाधिकारी कारणीभूत असल्याचा रोष व्यक्त करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे सोमवारी जिल्हा परिषद बरखास्त करण्याची मागणी केली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात त्यांच्या अनुपस्थितीत खुर्चीला हार घालण्यात आला. या आंदोलनात भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद दिसून आला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी खुर्चीला हार घातल्यानंतर अध्यक्षांच्या दालनात लागलेल्या छायाचित्रांकडे मोर्चा वळविला. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व आमदार वीरेंद्र जगताप यांची छायाचित्रे दालनात आहेत; विद्यमान राष्ट्रपती, पंतप्रधान यांची का नाहीत, असा सवाल करीत भाजप कार्यकर्त्यांनी सदर छायाचित्रे भिंतीवरून काढली आणि तेथे उपस्थित कर्मचाºयाच्या स्वाधीन केले. प्रारंभी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे गटनेता प्रवीण तायडे, जयंत आमले यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या दालनात धडक दिली. जिल्हा परिषदेला शासनाकडून पांदण रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, त्याचा वापर कुठेही झाला नाही. आरोग्य केंद्रांची अवस्था शोचनीय झाली आहे. जनसुविधेचा पाच कोटींचा निधी अध्यक्षांनी न्यायालयात धाव घेतल्याने परत गेला. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या बैठकी आमदारांच्या घरी होतात आदी मुद्दे भाजपने सीईओंना दिलेल्या निवेदनात मांडले. रवींद्र मुंदे यांनी सत्ताधाºयांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामे रखडल्याचा आरोप केला. आंदोलनात प्रवीण तायडे, तात्या मेश्राम, जयंत आमले, मिलिंद बांबल, नितीन पटेल, विजय काळमेघ, साहेबराव काठोळे, विजय मेंढे, अनिल कुंडलवार, सुनील गवळी आदी सहभागी झाले होते.
दरम्यान, भाजपच्या आंदोलनाची वार्ता कळताच युवक काँग्रेसने जिल्हा परिषदेत धाव घेतली. मात्र, तोपर्यंत भाजप कार्यकर्ते जिल्हा परिषदेतून निघून गेले होते.
झेडपी बरखास्त करून दाखवाच; वीरेंद्र जगताप यांचे आव्हान
राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यांनी काँग्रेसशासित जिल्हा परिषद बरखास्त करून दाखवाव्यात, असे प्रतिआव्हान आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिले. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असल्याने भाजप सदस्यांनी विरोधाच्या राजकारणातून ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकासाच्या कोट्यवधीच्या निधीस दीड वर्षांपासून डीपीसीची मंजुरी मिळू दिलेली नाही. परिणामी विकासकामांवर निधी खर्च करता आला नाही. आता मान्यता मिळाली, तर निधीच्या मुदतवाढीचा चेंडू शासनाच्या कोर्टात आहे. निधी कुणामुळे थांबवला हे जगजाहीर आहे, असे आ. जगताप म्हणाले.
जिल्हा परिषदेतील भाजप पदाधिकाऱ्यांनीच शासनाच्या माध्यमातून विकासकामांत आडकाठी आणून विकासकामे अडचणीत आणली. ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ ही भाजपची कार्यशैली आहे. आंदोलनाला घाबरत नाही. सर्व निधी विकासकामांवर खर्च होईल.
- बबलू देशमुख
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
जिल्हा नियोजन समितीने तत्कालीन पालकमंत्र्याच्या माध्यमातून कामे रोखली. पांदण रस्त्याचा जिल्हा परिषदेशी काडीचाही संबंध नाही. भाजप पदाधिकाऱ्यांना योजनांचा अभ्यास नाही. हे आंदोलन केवळ राजकीय स्टंट आहे.
- नितीन गोंडाणे
अध्यक्ष, जिल्हा परिषद
जिल्हा परिषदेचा कारभार पदाधिकारी व नेत्यामुळे ढेपाळला. यामुळे विकासाचा निधी परत गेला आहे. जनविकासाप्रति उदासिन असलेल्या सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्यात यावे, यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
- दिनेश सूर्यवंशी
जिल्हाध्यक्ष, भाजप