आचारसंहितेपूर्वी झेडपीतील भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:46 PM2018-12-19T22:46:46+5:302018-12-19T22:47:12+5:30
जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतिप्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होईल, असे संकेत १३ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील चर्चेच्या वेळी मिळाले. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहेत. राज्यात सर्व जिल्हा परिषदांमधील लेखी परीक्षेचे वेळापत्रक सारखे राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतिप्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होईल, असे संकेत १३ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील चर्चेच्या वेळी मिळाले. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहेत. राज्यात सर्व जिल्हा परिषदांमधील लेखी परीक्षेचे वेळापत्रक सारखे राहणार आहे.
ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांनी जिल्हा परिषदांकडे भरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेतून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सानप यांच्यासह ११ विभागांचे खातेप्रमुख आदींनी सहभाग घेतला होता. रिक्त पदे, पदांची बिंदूनामावली (रोस्टर) मराठा आरक्षणासह तयार केली. बिंदूनामावली तपासणीसाठी मागासवर्ग कक्षाकडे पाठविणे यासंदर्भात आढावा घेतला. कर्मचारी भरतीच्या हालचाली जोरात सुरू आहेत.
जिल्हा परिषदेकडील २३ संवर्गातील रिक्त पदांची माहिती शासनास सादर केली जाणार आहे. याअनुषंगाने ३१ डिसेंबर २०१८ अखेर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे व १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या पुढील वर्षाच्या कालावधीत सर्वसाधारण क्षेत्रात २५७ आणि पेसा क्षेत्रात २४५ अशी ५०२ पदे रिक्त आहेत. यामध्ये २० टक्के पदे ही ग्रामपंचायत कर्मचारी व अनुकंपा संवर्गातून भरली जाणार आहेत. नियमानुसार या जागा वगळून इतर रिक्त असलेल्या व पुढे रिक्त होणारी पदे संवर्गनिहाय आहेत.
डिसेंबर २०१९ अखेर संवर्गनिहाय रिक्त पदे
औषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक महिला, कनिष्ठ आरेखक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक लिपिक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता बांधकाम, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी सांख्यिकी, कंत्राटी ग्रामसेवक, स्थापत्य अभियंता यांसारखी पदे रिक्त आहेत.
भरतीसाठी जाहिरात लवकरच
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कर्मचारी भरतीचे संकेत ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिल्याची माहिती जिल्हा परिषदेतून मिळाली. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावर प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. राज्यात एकाच वेळी परीक्षा होईल, असे संकेतही देण्यात आले. भरतीसाठी जाहिरात जिल्हास्तरावरून लवकर प्रसिद्ध होईल, असे संकेत मिळत आहेत.