शाळेला कुलूप, शिक्षक मिळेपर्यंत उघडू देणार नाही वर्ग; संतप्त ग्रामस्थांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:40 PM2023-09-14T12:40:29+5:302023-09-14T12:41:26+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
अमरावती : जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. अनेक वेळा निवेदन देऊनही शिक्षक न मिळाल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी शाळेला कुलूप ठोकून रोष व्यक्त केला. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाहीत, तोपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
शैक्षणिक सत्र २०२३-२४ सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. अजूनही जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिक्षक दिलेले नाहीत. असाच प्रकार नया अकोला येथील जिल्हा परिषद शाळेबाबत झाला. येथे दहावी व नववीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत. सरपंच व स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाच्या निदर्शनास हे आणून दिले. परंतु, शाळेला शिक्षक मिळाले नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी या शाळेला कुलूप ठोकून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला. शाळेत शिक्षक येत नाही, तोपर्यंत विद्यार्थीही शाळेत बसणार नसल्याची भूमिकाच गावकऱ्यांनी घेतली आहे.
गावातील काही पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना खासगी शिकवणी वर्ग लावून दिले आहेत. परंतु, प्रत्येकच विषयासाठी शिकवणी वर्ग लावणे हे पालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये नया अकोला येथील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. जर शासन आणइ प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.
मेळघाटातील दोन शिक्षकांची बदली नया अकोला येथे झाली आहे. परंतु, ते रीलिव्ह झालेले नाहीत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसात नया अकोला येथील शाळेसंदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल.
- बुद्धभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी
शिक्षक मिळावे यासाठी आम्ही शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्यार्थी शिक्षकांविना चाचपडत आहेत. त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटली. हे कुलूप शिक्षक मिळाल्यानंतरच उघडेल.
- सुजाता तिडके, सरपंच
मी दहाव्या वर्गात शिकतो. आमच्या बोर्डाच्या परीक्षेला फक्त पाच महिनेच उरले आहेत. परंतु, आम्हाला एकही शिक्षक नाही. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा कालावधी उलटून गेला आहे. आमच्या भविष्याचा विचार शासनाने तातडीने करावा.
- ओम भुरे, विद्यार्थी