>> ज्योतिषी सोनाली लिखितकर
सतत अडचणी येऊ लागल्या ,की नकळत आपल्या तोंडातून निघते की काय साडेसाती लागलीय .... कधी संपणार कोणास ठाऊक? कोणाच्या कुंडलीत खरोखरच साडेसाती सुरु असेल किंवा येणार असेल तर तो माणूस खूपच भेदरलेला असतो की काय होणार काय माहित ...आजचा लेख लिहिण्याचे मूळ उद्दिष्ट हेच आहे की साडेसाती म्हणजे काय आणि तिला घाबरांयचे खरोखर कारण आहे का?
आकाशामध्ये जे १२ प्रकारचे तारकासमूह आहेत त्यांना राशी म्हणतात.
१) मेष ,२) वृषभ,३) मिथुन ,४) कर्क ,५) सिंह , ६) कन्या ,७) तूळ , ८) वृश्चिक ,९) धनु ,१०) मकर ,११) कुंभ,१२) मीन
त्यामध्ये जेव्हा शनी या १२ राशी पैकी एखाद्या विशिष्ट राशीतून भ्रमण करतो तेव्हा, त्या राशीच्या आधीच्या राशीला, त्या विशिष्ट राशीला आणि नंतरच्या राशीला साडेसाती आहे असे म्हणले जाते .म्हणजेच उदाहरणार्थ शनी सध्या मकर राशीत आहे म्हणुन मकर राशीला ,तिच्या मागच्या धनु राशीला आणि पुढच्या कुंभ राशीला साडेसाती आहे.
आता या साडेसातीला घाबरण्याचे कारण म्हणजे शनी जेव्हा आपल्या राशीत ,किंवा आपल्या राशीच्या जवळच्या राशीत येतो तेव्हा आपल्याला बऱ्याच अडचणी उत्पन्न होतात .याचे कारण समजून घ्यायचे म्हणले तर आपल्याला शनी ग्रहाचे गुणधर्म लक्षात घेतले पाहिजेत .हा ग्रह अतिशय संथ ,सावकाश आहे . एकलकोंडा ,सत्य प्रिय आणि प्रत्येक व्यक्तीला, त्या व्यक्तीची स्वतःची जागा दाखवून देणारा ग्रह आहे .म्हणूनच ज्या व्यक्तीचे पाय जमिनीवरच आहेत तिला या साडेसातीचा विशेष त्रास होत नाही .पण स्वतःच्याच धुंदीत असणाऱ्या ,काम क्रोध ,लोभ ,मोहात अडकलेल्या व्यक्तीला या साडेसातीचा अतिशय त्रास होतो.
आता नीट विचार केलात ,की जर एखादी व्यक्ती स्वतःला अतिशय भारी समजते . तिला स्वतःशिवाय बाकीचे जग कस्पटासमान वाटते . पैशाशिवाय दुसरी गोष्ट सुचत नाही . घरात सासू सासरे,नणंद यांना पाण्यात पहाते. किंवा नोकरीच्या ठिकाणी घाणेरडे राजकारण करते. लाचखोरी करते. स्वतःशिवाय दुसऱ्या कोणालाही मदत करत नाही. तर मग अशा व्यक्तीला शनी महाराज स्वतःचा झटका दाखवल्याशिवाय राहत नाहीत. मग पूर्णपणे तावून सुलाखून बाहेर काढायचा प्रयत्न ,शनिदेव करतात .आता त्या साडेसातीलाही ना जुमानता पुन्हा ये रे माझ्या मागल्या .अशा प्रकारे पुन्हा सर्व विसरून पुन्हा वाईट मार्गाने जाणारे कमी लोकं नाहीत .पण या साडे सातीचा धडा घेऊन त्यातून माणूस स्वतःला चांगला घडवायचा प्रयत्न करेल तर ती खरी परीक्षा .
एका राशीत अडीच वर्षे अशा प्रकारे ३ राशीत शनी साडेसात वर्षे साडेसाती देतो असे मानले जाते . आता या मध्ये अडीच वर्षे उत्तम अडीच वर्षे मध्यम तर अडीच वर्षे अत्यंत वाईट जातात असा समज आहे .पण तो अत्यंत चुकीचा समज आहे कारण. अशी कोणतीही विभागणी शनी करत नाही. जर तुम्ही आलेल्या संकटांमधून काही शिकला नाहीत तर सर्व साडेसात वर्षे वाईट सुद्धा जाऊ शकतात. २ वर्षापूर्वी माझ्याकडे एक मुलगी आली होती. स्वाती ...तिला ३, ४ वर्षापासून साडेसाती सुरु होती . ती म्हणली ,माझे वडील अचानक मला साडेसाती असताना गेले. माझी आजी सुद्धा गेली .तसेच माझे काका अर्धांग वायुने आजारी आहेत आणि मला पण नोकरी मिळत नाहीय. माझी आई हल्ली माझ्यावर आणि घरात पण खूप चीड चीड करते .या साडेसातीने मी खूप हैराण झालीय .काहीतरी उपाय सांगा, रत्न सांगा. पूजा सांगा...
तिला मी विचारले एक सांग, तुझ्या वडिलांचे वय काय होते? ....ती म्हणली ५५ .
कशाने गेले वडील? ......ती म्हणाली ,ते खूप दारू प्यायचे .लिवर खराब झाले. म्हणुन गेले .
आजी किती वर्षाची होती ....ती म्हणली ८३ वर्षे ...म्हातारपणाने गेली .
मग मी म्हणाले ....अग तुझे वडील दारू पीत होते ,ते काही शनिदेवाच्या परवानगीने पीत होते का? तुझी आजी आता जर ८३ वर्षाची होती ,तर ती वृद्धत्वामुळे आज ना उद्या जाणारच होती . अर्धांग वायू हा कुणालाही होऊ शकतो आणि तुझे काका हे तुझ्या नात्यातील आहेत. नात्यातल्या प्रत्येकाला होणाऱ्या दुष्परिणामाला साडेसाती जबाबदार नाही . आणि तुला नोकरी नाही म्हणतेस .तुझे शिक्षण काय ? ती म्हणाली मी १२ वी शिकले आहे . पुढे शिकले नाही .
मग तिला मी सांगितले अग शिक्षण चांगले असेल तर नोकरी सहज मिळेल नाहीतर कुठून मिळणार ? मग तिची कुंडली पाहून तिला विचारले ,तुला नक्कीच एखादी कला येत असणार ,त्यात आवड असणार . आणि तीच कला तुला पैसा मिळवून देईल " .ती म्हणाली, हो ताई ,मी शिवण चांगले शिवू शकते. मग तिला त्याच गोष्टीत व्यावसायिक पणे पुढे जाण्यास सांगितले.
तर असे हे गैरसमज पसरले जातात साडेसातीच्या बाबत .वास्तविक पाहता साडेसाती नसतानासुद्धा आपण काही खूप सुखी असतो असे मुळीच नाही .पण आपल्याला साडेसाती मूळे भीती वाटते हे मात्र खरे. आता काही साडेसातीचे उपाय पाहू.
साडेसातीचे पारंपारिक उपाय धार्मिक खालीलप्रमाणे
१) शनी मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन शनिवारी तेल वहावे. रुईच्या पानांची माळ वाहने
२) काळ्या रंगाचे कांबळे शनिदेवास अर्पण करणे
३) शनी देवास काळे उडीद वाहने
४) दर शनिवारी मारुती समोर नारळ फोडावा
त्याबरोबरच जे हल्लीच्या काळाप्रमाणे मला योग्य वाटतात ते उपाय ..
१) एखाद्या गरीब माणसास तळलेला पदार्थ दर शनिवारी खायला देणे उडदाचा वडा वडापाव किंवा फरसाण इत्यादी
२) गरीब निराधार व्यक्तीस एक काळ्या किंवा निळ्या रंगाचे ब्लँकेट देणे
३) सर्व कामे सावकाश करणे . जे काम आठ दिवसांत होईल असे वाटते त्यासाठी महिनाभर लागेल असे धरून चालले
४) खरे बोलणे दुस याला न फसवणे दुसर्यांविषयी वाईट विचार न करणे या गोष्टींचे पालन करणे.
अशाप्रकारे सर्व माहिती वाचल्यावर तुमच्याही मनातील साडेसातीची भीती नक्की दूर झाली असेल याची खात्री आहे. तरीदेखील साडेसातीशी संबंधित काही प्रश्न असल्यास केवळ व्हाट्स अप वर संपर्क करावा 9890447025.