शहरात अराजकता माजविणाऱ्या ३०० गुंडांवर तडीपारीची संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:59 PM2019-02-04T22:59:46+5:302019-02-04T23:00:23+5:30
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाºया रेकॉर्डवरील सुमारे ३०० गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. चोरी, घरफोडीसोबतच हाणामारीचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुंडांवर ही संक्रांत आली आहे.
औरंगाबाद : शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाºया रेकॉर्डवरील सुमारे ३०० गुन्हेगारांना शहरातून हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस प्रशासनाने सुरू केल्या आहेत. चोरी, घरफोडीसोबतच हाणामारीचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या गुंडांवर ही संक्रांत आली आहे.
या वर्षात लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात याकरिता पोलीस प्रशासनाने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी शहरातील प्रमुख अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १७ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. प्रत्येक ठाण्यांतर्गत पोलिसांच्या रेकॉर्डवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी देण्यात आले होते. यातील जे गुन्हेगार सक्रिय आहेत. शिवाय त्यांच्याविरोधात वर्षभरात चोरी, घरफोडी, मारहाण करणे, शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विक्री करणे, गावठी अथवा हातभट्टी दारूचा अड्डा चालविणे, देशी दारूची चोरट्या मार्गाने विक्री करणे आदी स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत, अशा लोकांमुळे शहराच्या शांततेला धोका आहे. आगामी निवडणुका शांततेत पार पडाव्यात याकरिता शहरातील सुमारे ३०० गुन्हेगारांना तडीपार करण्याचा विचार वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे. याकरिता या गुन्हेगारांच्या नावाच्या याद्या प्रत्येक पोलीस ठाण्याला पाठविण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरोधातील गुन्ह्यांचा संदर्भ घेऊन हद्दपारीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात शहर विभागातील ७९ जणांचा समावेश आहे.
सात जणांवर एमपीडीएची कारवाईची शक्यता
तडीपारीची कारवाई करूनही जे लोक गुन्हेगारी कृत्य सोडत नाहीत, अशा सात गुन्हेगारांना एमपीडीएखाली हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले जाऊ शकते. ही कारवाई करण्यासाठी त्या गुन्हेगारांविरुद्ध नव्याने दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.