Asian Games 2018 : जॉन्सनची कामगिरी, रिओ ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्टलाही भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 09:45 AM2018-08-31T09:45:18+5:302018-08-31T09:47:18+5:30
जॉन्सनने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमधील याच शर्यतीमधील सुवर्णपदक विजेत्या धावपटूपेक्षा सरस वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला
नवी दिल्ली - इंडोनेशियातील जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सनी सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. गुरुवारी 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या जिन्सन जॉन्सनने सुवर्णपदाची कमाई केली. हे सुवर्णपदक मिळवताना जॉन्सनने 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमधील याच शर्यतीमधील सुवर्णपदक विजेत्या धावपटूपेक्षा सरस वेळ नोंदवण्याचा पराक्रम केला.
800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यानंतर जॉन्सनने 1500 मीटर शर्यतीवर आपले लक्ष केंद्रित केले होते. या शर्यतीत जॉन्सनने दमदार कामगिरी करताना 3 मिनिटे 44 : 72 सेकंद एवढा वेळ नोंदवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या कामगिरीची 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्याच्या कामगिरीशी तुलना केली असता ती ऑलिम्पिकमधील कामगिरीपेक्षा सरस असल्याचे दिसते. रिओ ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या मॅथ्यू याने 3 मिनिटे 50:00 सेकंद एवढा वेळ नोंदवला होता.
खरंतर आशियाई क्रीडास्पर्धेत नोंदवलेली वेळ ही जॉन्सनची सर्वोत्तम कामगिरी नाही. याचवर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत जॉन्सनने आपली सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. त्यावेळी त्याने 1500 मीटरची शर्यत 3 मिनिटे 37:62 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
दरम्यान, यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अॅथलेटिक्समध्ये 1978 नंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. भारताने या स्पर्धेत सात सुवर्ण, 10 रौप्य आणि आणि दोन कांस्य अशी एकूण 19 पदकांची कमाई केली आहे.