Asian Games 2018 : खेळता येत नाही म्हणून कंपनीने काढलं, पण 'त्यानं' जिद्दीनं सुवर्णपदकच जिंकून दाखवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:45 PM2018-08-30T12:45:13+5:302018-08-30T12:49:08+5:30
Asian Games 2018 : तुझ्यातील खेळाडू संपला, तुला आता स्पर्धा जिंकणे शक्य होणार नाही अशी सबब देत सार्वजनिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीने एका खेळाडूला घरचा रस्ता दाखवला होता. मात्र...
नवी दिल्ली - तुझ्यातील खेळाडू संपला, तुला आता स्पर्धा जिंकणे शक्य होणार नाही अशी सबब देत सार्वजनिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीने एका खेळाडूला घरचा रस्ता दाखवला होता. मात्र या खेळाडूने नोकरी गेल्याने आलेल्या नैराश्यावर मात करत जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत देशासाठी सोनेरी पदकाची कमाई केली. हा खेळाडू म्हणजे आशियाई क्रीडास्पर्धेतील पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा मनजित सिंग होत.
2014 साली मनजितला सार्वजनिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीने खेळायला जमणार नाही असे सांगत कामावरून काढून टाकले होते. काही काळ निराशेत घालवल्यानंतर मनजितने स्वत:ला सिद्ध करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली. घरदार विसरून सराव केला. अखेरीस 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सोनेरी यश त्याच्या पदरात पडले.
मनजित या यशाबद्दल म्हणतो, जेव्हा माझी नोकरी गेली त्यावेळी काही काळ मी निराश झालो होतो. पण मी संपलेलो नाही हे मला सिद्ध करायचं होतं. मी स्वत:ला सुवर्णपदकाचा दावेदार मानत नव्हतो. गेली दोन वर्षे मी खूप तयारी केली होती. त्याचेच फळ शेवटी मला मिळाले. ज्यांनी मला कामावरून कमी केले. त्यांना मी काहीही उत्तर देऊ इच्छित नाही. त्यांच्या ठिकाणी ते योग्य होते."
सुवर्णपदक जिंकल्यानंतर मनजितला नोकरीबाबत कोणतीही चिंता वाटत नाही. कारण हरियाणा सरकार आता आपल्याला चांगली नोकरी देईल असे त्याला वाटते. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मनजित जेव्हा सराव करत होता तेव्हा त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. मात्र सरावामुळे त्याला स्वत:चा मुलाचा चेहराही पाहता आला नाही. तेव्हा एवढाच जर त्याग करत असाल तर मुलासाठी सुवर्णपदकच घेऊन या, अशी इच्छा त्याच्या पत्नीने व्यक्त केली. अखेर मनजितने सुवर्णपदक जिंकून आपल्या पत्नीची इच्छाही पूर्ण केली.