राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत अविनाश साबळेला विक्रमासह सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:27 AM2018-09-29T03:27:01+5:302018-09-29T03:27:39+5:30
मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पुणे : मूळ पुण्याचा रहिवासी असलेल्या पण सेनादलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अविनाश साबळे याने राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने पुरूषांंच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये हा पराक्रम करताना नवी राष्ट्रीय विक्रम प्रस्थपित केला. महाराष्ट्राच्या अर्चना आढाव आणि रोझलीन डिसुझा या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अनुक्रमे रौप्य तसेच कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. पुरूषांच्या ३००० मीटर स्टिचलचेसमध्ये अविनाशने ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम इतिहासजमा करताना ८ मिनिटे २९.८० सेकंदांची प्रभावी वेळ नोंदविली. यापूर्वी हा विक्रम गोपाल सैनीच्या नावावर होता. त्याने १९८१ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत ८ मिनिटे ३०.८८ अशी वेळ नोंदविली होती. २४ वर्षीय अविनाशने हा विक्रम आज मागे टाकला. सेनादलाचाच राकेशकुमार स्वामी दुसरा आला. त्याने ८ मिनिटे ४७.३१ सेकंद अशी वेळ दिली. दुर्गा बहादूर (८ मिनिटे ४८.२९ सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिला.
२४.६८ सेकंद वेळेसह रोझलीन हिने महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक प्राप्त केले. या प्रकारात कर्नाटकची रीना जॉर्ज (२४.१० सेकंद) सुवर्णपदकाची मानकरी ठरली. रेल्वेच्या छावी एस. हिने २४.२३ सेकंद वेळ देत रौप्यपदक आपल्या नावे केले.
महिलांच्या ३००० मीटर स्टिपलचेस प्रकारात महाराष्ट्राची कोमल जगदाळेला (१० मिनिटे ३३.५६ सेकंद) पदक जिंकण्यात अपयश आले. ती चौथी आली. रेल्वेच्या चिंता यादवने १० मिनिटे व १०.१९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
अर्चनाचे सुवर्ण .०३ सेकंदाने हुकले
महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अर्चनाचे सुवर्ण अवघ्या .०३ सेकंदांनी हुकले. अतिशय अटीतटीच्या ठररलेल्या या शर्यतीत ओएनजीसीच्या टिष्ट्वंकल चौधरीने २ मिनिटे ७.४३ सेकंद वेळेसह बाजी मारली. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू असलेल्या अर्चनाने २ मिनिटे ७,४६ सेकंद अशी वेळ दिली. तमिळनाडूच्या गोमतीने २ मिनिटे ८.५९ सेकंद वेळ देत कांस्यपदक मिळविले.