एखादा तरी ‘बोल्ट’ तयार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 06:07 AM2017-12-31T06:07:22+5:302017-12-31T06:07:44+5:30
क्रीडाप्रेमी असोत की कट्टर पाठीराखे, २०१८ सालात आपणाला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले तर तो बोनस ठरावा. एखाददुसरा उसेन बोल्ट दशकभरामध्ये हाती लागला तर ते फार मोठे यश असेल!
- रणजीत दळवी
सव्वाशे कोटींची लोकसंख्या असणाºया भारतापाशी १०० उसेन बोल्ट निर्माण करण्याची क्षमता आहे! हे विधान आहे अॅथेन्स (२००४) आॅलिम्पिकमध्ये ट्रॅप शूटिंगचे रौप्यपदक जिंकणाºया कर्नल राजवर्धन सिंग राठोड यांचे. राजकारणात प्रवेश करणाºया राठोड यांच्यासारख्या खेळाडूला प्रथमच देशाचे क्रीडामंत्रीपद देण्यात आले ही गोष्ट दूरदर्शीपणाची म्हणावी लागेल. क्रीडाप्रेमींना थोडा दिलासा किंवा त्यांची अपेक्षापूर्ती करण्याचे आश्वासन देताना शंभर उसेन बोल्ट निर्माण करण्याची क्षमता भारताकडे आहे, असे म्हणणे कितपत योग्य? ज्या देशाला आजवरच्या आॅलिम्पिक इतिहासामध्ये उसेन बोल्टएवढी पदके सर्व खेळांमध्ये मिळवता आली नसतील तर राठोड यांनी असे विधान करणे चुकीचे नाही का?
२०१७ या वर्षातील आपली क्रीडा क्षेत्रातील कामगिरी समाधानकारक नाही. ही पार्श्वभूमी पाहता २०१८ मध्ये भारत कोठे असेल? आशियाई व राष्टÑकुल स्पर्धांचे हे वर्ष. गेल्या दोन आशियाई खेळांमध्ये आपण २५ सुवर्णपदकांसह ११९ पदके मिळवली. साधारणपणे राष्टÑकुल खेळांमध्येही आपली तशीच स्थिती होती. अॅथलेटिक्स, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, वेटलिफ्टिंग, कुस्ती, तिरंदाजी आणि टेनिस हे खेळ आपली शक्तिस्थाने जरी असली तरी चीन, जपान, दोन्ही कोरिया, आॅस्ट्रेलिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कॅनडा यासारख्या बलशाली देशांसमोर आपण थिटे पडतो. अशा स्थितीत राठोड यांनी काही नवे उपाय योजले आहेत. २०२०, २०२४ आणि २०२८ या आॅलिम्पिकसाठी सोयी-सुविधा व साधने निर्माण करण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखविली आहे.
(लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.)