औरंगाबादच्या साक्षीचे राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:17 AM2018-12-05T00:17:29+5:302018-12-05T00:24:15+5:30
तिरुपती येथे सोमवारी झालेल्या १६ व्या आंतरजिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू साक्षी चव्हाण हिने देदीप्यमान कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. साक्षी चव्हाणने १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील १00 मी. धावण्याची शर्यत १२.३८ सेकंद वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
औरंगाबाद : तिरुपती येथे सोमवारी झालेल्या १६ व्या आंतरजिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादची प्रतिभावान खेळाडू साक्षी चव्हाण हिने देदीप्यमान कामगिरी करताना राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
साक्षी चव्हाणने १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील १00 मी. धावण्याची शर्यत १२.३८ सेकंद वेळ नोंदवताना राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. साक्षी चव्हाणने याआधी केरळच्या मंजिदा नोव्हरीन हिचा १२.७३ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. मंजिदाने हा विक्रम २ डिसेंबर २0१0 मध्ये नोंदवला होता. ऐश्वर्या मोरेने १२.८३ वेळ नोंदवीत दुसरा क्रमांक मिळवला, तर ठाणे येथील सिया सावंतने १३ सेकंदांसह तिसरा क्रमांक पटकावला.
साक्षी चव्हाण ही सातारा परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी असून, ती क्रीडा प्रबोधिनी येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४ वर्षांपासून सराव करते. या यशाबद्दल क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव फुलचंद सलामपुरे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, पंकज भारसाखळे, अनिल निळे, सुनील वानखेडे, न्यू इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक बिना थॉमस यांनी साक्षीचे अभिनंदन केले आहे.
याआधीही उमटवला विशेष ठसा
चव्हाणने याच वर्षी १२ जानेवारी रोजी तिने रत्नागिरी येथील राष्ट्रीय स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात २00 मी. धावण्याची २५.८ सेकंदात जिंकत सुवर्णपदक मिळवले होते. त्याचप्रमाणे याच स्पर्धेत तिने १00 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकताना पदकांचा डबल धमाकाही केला होता.
याच वर्षी तिने ४ बाय १00 मी. रिलेत ४६.८ सेकंदाची वेळ नोंदवत महाराष्ट्राला कास्यपदक मिळवून देण्यात निर्णायक योगदान दिले होते.
तिने नागपूर येथील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत २00 मी. मध्ये सुवर्ण व १00 मी. मध्ये रौप्यपदक जिंकले होते. तिने पुणे येथील सबज्युनिअर स्पर्धेत १00 मी. शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात साक्षीने दिल्ली येथे गेल इंडियातर्फे ‘इंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अॅथलेटिक्स स्पर्धेत २00 मी. धावण्याची शर्यती २६ सेकंदांत जिंकत सुवर्ण आणि १00 मी. मध्ये रौप्यपदक पटकावले होते.