अर्ध मॅरेथॉनमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा नारा, पुरुषांमध्ये कोल्हापूरच्या दीपक कुंभारने सेनादलापुढे निर्माण केले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 04:45 PM2018-01-21T16:45:03+5:302018-01-21T16:45:55+5:30
वरळी डेअर येथून पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी सुरु झालेल्या अर्ध मॅरेथॉनला धावपटूंचा तुफान प्रतिसाद मिळाला. थंड वातावरणामध्ये सुरु झालेल्या या शर्यतीमध्ये अव्वल धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. महिला गटामध्ये संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे या नाशिककरांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावताना आपला दबदबा राखला.
मुंबई - वरळी डेअर येथून पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी सुरु झालेल्या अर्ध मॅरेथॉनला धावपटूंचा तुफान प्रतिसाद मिळाला. थंड वातावरणामध्ये सुरु झालेल्या या शर्यतीमध्ये अव्वल धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. महिला गटामध्ये संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे या नाशिककरांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पटकावताना आपला दबदबा राखला. रेल्वेच्या जुमा खातून हिने कांस्य पदकावर नाव कोरले. त्याचवेळी, पुरुष गटात प्रदीप सिंग आणि शंकरमान थापा या सेनादलाच्या धावपटूंनी पहिल्या दोन क्रमांकावर कब्जा मिळवला, तर कोल्हापूरच्या दीपक कुंभार याने कांस्य पदकावर नाव कोरले.
महिला गटामध्ये जेतेपदासाठी संजीवनी आणि मोनिका यांच्यामध्ये कडवी चुरस रंगली. दोघीही १० किमी अंतरापर्यंत एकत्रित होत्या. जुमा, किरण आणि जनाबाई हिरवे यांनीही या दोघींना कडवी टक्कर देताना शर्यतीमध्ये रंगत आणली. मात्र, २० किमीनंतर संजीवनीने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना १ तास २६ मिनिटे २४ सेकंदाची विजयी वेळ नोंदवली. त्याचवेळी, मोनिकाने (१:२७:१५) दुसरे स्थान निसटणार नसल्याची खबरदारी घेत रौप्य पटकवाले, तर जुमाने (१:२७:४८) कांस्य पदकावर नाव कोरले.
पुरुष गटामध्ये मात्र सेनादलाच्या धावपटूंनी अपेक्षित वर्चस्व राखले. प्रदीप सिंग आणि शंकरमान थापा या सेनादलाच्या धावपटूंना चांगली टक्कर दिलेल्या कोल्हापूरच्या दीपक कुंभारने कांस्य पदक पटकावण्यात यश मिळवले. सुवर्ण पदकाची चुरस प्रदीप आणि शंकरमान यांच्यामध्येच रंगली. तरी कुंभारने या दोघांपुढे आव्हान निर्माण केले. पहिले १० किमी अंतर कुंभारने अनपेक्षितपणे आघाडी राखली. यावेळी तो अनपेक्षित निकाल लावणार असेच चित्र होते. मात्र, शंकरमानने नंतर आघाडी घेतली आणि त्यानंतर मोक्याच्यावेळी वेग वाढवताना प्रदीपने तिसºया क्रमांकावरुन थेट आघाडी मिळवत अखेरपर्यंत आपले स्थान कायम राखले. तसेच, कुंभारला वेगामध्ये सातत्य कायम राखण्यात अपयश आल्याने अखेर कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. प्रदीपने १ तास ५ मिनिटे ४२ सेकंदाची विजयी वेळ नोंदवली. शंकरमानने १ तास ६ मिनिटे ४० सेकंद आणि कुंभारने १ तास ६ मिनिटे ५४ सेकंदाची वेळ नोंदवत पोडियम स्थान पटकावले.