वेगाचा बादशहा उसेन बोल्ट शेवटची शर्यत धावण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 11:16 AM2017-08-01T11:16:45+5:302017-08-01T11:19:34+5:30

लंडनमध्ये होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्ट त्याच्या कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावताना दिसणार आहे. आपल्या कारकिर्दीतील ही शेवटची शर्यत सुवर्णपदक पटकावून संपवण्याचा बोल्टचा निर्धार आहे.

Jamaican Athlete The Worlds Fastest Man Usain Bolt to run his last race | वेगाचा बादशहा उसेन बोल्ट शेवटची शर्यत धावण्याच्या तयारीत

वेगाचा बादशहा उसेन बोल्ट शेवटची शर्यत धावण्याच्या तयारीत

googlenewsNext
ठळक मुद्दे4 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान लंडन वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धा पार पडणार आहेगेल्या तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उसेन बोल्टने 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटरमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला होता

लंडन, दि. 1 - पृथ्वीतलावरील सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून ख्याती असलेला धावपटू उसेन बोल्ट याला धावपट्टीवर धावताना पाहणं म्हणजे एक पर्वणीच. उसेन बोल्ट शर्यतीत सहभागी असेल आणि शर्यत सुरु झाल्यावर जर का तुमची नजर चुकली तर तेवढ्या वेळात उसेन बोल्टने अंतिम रेषा पार केलेली असते. 'फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी ख्याती असलेला उसेन बोल्ट मात्र लवकरच मैदानात नाही तर मैदानाबाहेर बसून शर्यतीचा आनंद लुटताना दिसेल. कारण लंडनमध्ये होणा-या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उसेन बोल्ट त्याच्या कारकीर्दीतील शेवटची शर्यत धावताना दिसणार आहे. आपल्या कारकिर्दीतील ही शेवटची शर्यत सुवर्णपदक पटकावून संपवण्याचा बोल्टचा निर्धार आहे.

आतापर्यंत आठवेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करणा-या उसेन बोल्टने निवृत्तीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'लंडनमध्ये जिंकणं माझं मुख्य लक्ष्य आहे. विजयी पताका हाती घेऊन निवृत्त होण्याचा माझा मानस आहे', असं उसेन बोल्टने सांगितलं आहे. 

लंडनमध्ये आयएएफ (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन) तर्फे वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळवली जात आहे. 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान ही वर्ल्ड चॅम्पिअनशिप स्पर्धा पार पडणार आहे. पुरुषांची 100 मीटर स्पर्धा 5 ऑगस्ट रोजी तर  4x100 मीटर रिले स्पर्धा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

गेल्या तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये उसेन बोल्टने 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटरमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. खरंतर सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये नऊ पदकं जिंकण्याचा रेकॉर्ड बोल्टच्या नावावर होता. मात्र त्याचा सहकारी खेळाडू नेस्ता कार्टर बंदी घातलेल्या पदार्थांमध्ये पॉझिटिव्ह आढळल्याने ते पदक बाद करण्यात आलं. बीजिंगमध्ये झालेल्या 4x100 मीटर रिले स्पर्धेत हे सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यामुळे सुवर्णपदकांचा आकडा आठवर पोहोचला. 

11 विश्वविजेतेपदं आतापर्यंत बोल्टच्या नावावर जमा आहेत. 9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला होता.

आपल्या या सुवर्ण कारकिर्दीची सांगताही विजयाने व्हावी यासाठी उसेन बोल्टचा प्रयत्न असून विजयी झेंडा हाती घेऊनच बोल्ट निरोप घेईल अशी चाहत्यांनाही अपेक्षा आहे. 

Web Title: Jamaican Athlete The Worlds Fastest Man Usain Bolt to run his last race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.