मल्लाला २५ लाख रुपये नुकसानभरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:03 AM2017-09-04T01:03:26+5:302017-09-04T01:03:44+5:30
मल्ल सतीशकुमार यांना बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी चुकीने २००२ मध्ये १४ व्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते.
नवी दिल्ली : मल्ल सतीशकुमार यांना बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी चुकीने २००२ मध्ये १४ व्या आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखण्यात आले होते. या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने मल्लाला २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देताना न्यायालयाने खडे बोल सुनावले आहे. न्यायालयाने म्हटले आहे, की खेळाची माहिती नसलेल्या अधिकाºयाच्या नेतृत्वाखालील महासंघ खेळाडूंसोबत कसे वर्तन करतो, यावरून विश्वपातळीवर भारत पदक मिळवण्यात का संघर्ष करीत आहे, हे स्पष्ट होते.
सीआयएसएफच्या कुमारने २००६ च्या मेलबोर्न राष्ट्रकुल व लॉस एंजिल्समध्ये विश्व पोलीस क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत देशाचे नाव उंचावले होते.
डब्ल्यूएफआयला दोषी ठरविण्याव्यतिरिक्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुरिंदर एस. राठी यांनी केंद्रामध्ये सामील सर्व अधिकाºयांविरुद्ध चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. महासंघ व अधिकाºयांच्या निर्णयामुळे कुमारची कारकीर्द जवळजवळ संपुष्टात आली आहे. या अधिकाºयांमध्ये डब्ल्यूएफआयच्या अधिकाºयांचाही समावेश आहे. न्यायालयाने सरकारला निर्देश देताना अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. कुमार यांना जो अपमान सहन करावा लागला, तसे भविष्यात कुणा खेळाडूसोबत घडायला नको. पंजाबमधील मल्ल कुमार यांची डब्ल्यूएफआयतर्फे दक्षिण कोरियातील बुसानमध्ये होणाºया १४ व्या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली होती.
पण, चुकीने त्याला अन्य खेळाडूंसह विमान प्रवासापासून रोखण्यात आले. कारण पश्चिम बंगालमधील हेच नाव असलेल्या एका मल्लाबाबत साशंकता निर्माण झाली होती.
पश्चिम बंगालचा मल्ल त्या वेळी डोपमध्ये अडकल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. (वृत्तसंस्था)