Mumbai Marathon : मुंबई मॅरेथॉनला अफाट प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 12:58 AM2020-01-20T00:58:38+5:302020-01-20T03:00:18+5:30
या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आठ ते नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये वाढलेले ‘फिटनेस’चे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसून आले
- सागर नेवरेकर
मुंबई : रविवारी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वाधिक गर्दी दिसून आली. बच्चेकंपनीसह ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हिरिरीने सहभाग घेतला होता. कडाक्याच्या थंडीला न जुमानता मोठ्या प्रमाणात मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती दर्शवून मुंबईकरांनी अफाट प्रतिसाद दिला.
या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आठ ते नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये वाढलेले ‘फिटनेस’चे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसून आले. या वेळी मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील नामांकित धावपटू सज्ज झाले होते. यात केनिया, इथिओपियाच्या धावपटूंकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ ही थीम घेऊन घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष पाऊल उचलले होते.
यंदाचा मुंबई मॅरेथॉनचा चेहरा असलेला बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिला होता. ‘ड्रीम रन’ स्पर्धेदरम्यान टायगरने व्यासपीठावर हजेरी लावल्यावर त्याला पाहून धावपटूंनी एकच कल्ला केला. या वेळी टायगरला पाहण्यासाठी धावपटूंनी धावणे सोडून त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि या वेळी काही मिनिटांसाठी मॅरेथॉन थांबली होती. सरकारी अधिकारी-कर्मचारी, भारतीय डाक कर्मचारी, बँक कर्मचारी, एअर इंडिया कर्मचारी आणि खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता.
विशेष म्हणजे मुंबई मॅरेथॉनमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तसेच समाजात वाढणाºया अत्याचारांविरोधातील फलक घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. लैंगिक अत्याचार, बलात्कार, स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण संवर्धन व संरक्षण, प्लॅस्टिक बंदी इत्यादी विषयांवर धावपटूंनी जनजागृती केली. विविध संस्था व संघटनांचे कार्यकर्ते आणि सदस्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. लहान मुलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह हा मॅरेथॉन संपल्यावरही कायम होता. मॅरेथॉनमध्ये काही धावपटूंनी पारंपरिक वेशभूषा करून ‘हॅप्पी संडे’ द्विगुणित केला.
अपंगत्व आलेल्या १६ वीर जवानांनी लक्ष वेधले
मुंबई मॅरेथॉनमध्ये माजी सैनिकांनी सहभाग घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी त्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश मॅरेथॉनमध्ये दिला. सहभागी झालेल्या माजी सैनिकांना युद्धभूमीवर पराक्रम गाजवताना अपंगत्व आले होते. एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे जवान सहभागी झाले होते. चार वरिष्ठ अधिकारी, दोन कनिष्ठ अधिकारी आणि १० जवान अशा १६ जणांच्या चमूने सहभाग घेतला होता. यातील काही जवानांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. युद्धभूमीवरील जखमांना विसरून जवान मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
११९ धावपटूंचा वाढदिवस
या दिवशी ११९ सहभागी धावपटूंचा वाढदिवस होता. यामध्ये ८३ पुरुष तर ३६ महिला धावपटूंचा समावेश होता. त्यामुळे मॅरेथॉन आणि वाढदिवस हा योग जुळवत हटके सेलिब्रेशन करताना धावपटू दिसत होते. सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केले जात होते.
सर्व जण मोबाइलमध्ये व्यस्त...
१५ वर्षांपूर्वी ‘ड्रीम रन’ स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्या वेळी मी १३-१४ वर्षांचा होतो. त्या वेळी एकच विचार डोक्यात सुरू होता की, मला काहीही करून पहिला क्रमांक पटकावयाचा आहे. परंतु ते काही शक्य झाले नाही. कारण इतके सारे स्पर्धक होते की, त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर बाजी मारणे अवघड होते. सध्या सर्व जण मोबाइलमध्ये व्यस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. दिवसातला अर्धा तास तरी व्यायामासाठी दिला पाहिजे. सुदृढ आरोग्यासाठी धावणे हे गरजेचे आहे, याबाबत आता नागरिकांमध्ये जनजागृती वाढत असल्याचे मॅरेथॉनमध्ये दिसून आले.
- टायगर श्रॉफ, ब्रॅण्ड अॅम्बेसिडर, मुंबई मॅरेथॉन
डॉक्टरांना समजून घ्या...
मी एक डॉक्टर असून एक माणूसच आहे. मी माझे पूर्ण प्रयत्न केले त्या रुग्णाला वाचविण्यासाठी, पण नाही वाचवू शकलो. त्यासाठी लोकांनी मला मारहाण करावी. मला इतके मारावे की कदाचित मी स्वत:च मेलो असतो. हे का होतंय. मी देव किंवा भोंदूबाबा नाही. काहीतरी चमत्कार करून त्या रुग्णाला वाचवू शकेन. मी एक सर्वसामान्य डॉक्टर आहे. रुग्णांना वाचविण्याची मी शपथ घेतली आहे. मारण्याची शपथ घेतलेली नाही. तो रुग्ण का मेला, तर त्याची रुग्णवाहिका उशिराने पोहोचली. रुग्णवाहिका का उशिरा पोहोचली, याचा कोणी विचार केला आहे का? कदाचित आपल्यासारख्या असंख्य लोकांचे वाहन त्या रुग्णवाहिकेसमोर उभे होते. त्यामुळे रुग्णवाहिकेला वेळेवर पोहोचता आले नाही. कुठेतरी आपणच जबाबदार आहोत, त्या रुग्णवाहिकेला वेळेवर रुग्णालयात पोहोचण्यापासून थांबविणारे. मी एक डॉक्टर असून रुग्णांचे जीव वाचवतो. मला तुम्ही आशीर्वाद नाही दिलेत तरी चालतील. डॉक्टरांना मारू नका, हाच संदेश मॅरेथॉनमधून मुंबईकरांना देण्यासाठी आलो होतो.
- अभिजीत प्रभू, बोरीवली.
दिव्यांगांनीही मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा...
मी एम.ए.च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. माझे मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे पहिले वर्ष आहे. एका संस्थेच्या माध्यमातून मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो. १० किलोमीटर रनिंगमध्ये भाग घेतला होता. पहिल्यादा एवढे मोठे अंतर धावल्याने हात-पाय खूप दुखत आहेत.
- उदय भंडारी, चेंबूर.
मासिक पाळीबाबत जनजागृती
मैना महिला फाउंडेशन हे सॅनिटरी नॅपकीन पॅड उत्पादन करते. महिला व मुलींच्या आरोग्यासंबंधी काम करते. मॅरेथॉनमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती करण्यात आली. मॅरेथॉनमध्ये लहान मुलींनी सहभाग घेत हातात फलक घेऊन ड्रीम रन ही स्पर्धा पूर्ण केली.
- वैष्णवी आढाव, मैना महिला फाउंडेशन.
वासुदेव धावला...
आपण आता पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करू लागलो आहोत. त्याचबरोबर पारंपरिक संस्कृती विसरता कामा नये. हल्ली बघायला गेलो तर वासुदेव हा गायब झाला आहे. सकाळच्यापारी शोधूनही कुठे वासुदेव सापडत नाही. आज मी लोकांना दाखवून दिले की, वासुदेव हा काय असतो. वासुदेव हा खेड्यांमध्ये सकाळच्या वेळेस येतो. आणि सगळ्यांना उठवून जातो आणि भरभरून आशीर्वाद देतो.
- संध्या कोरडे, पनवेल.
व्हीलचेअर क्रिकेटचा प्रसार...
व्हीलचेअर क्रिकेटचा प्रसार यावर्षीही केला. माझ्यासोबत अजून दोघे जण होते. त्यांनी व्हीलचेअर टेनिस आणि व्हीलचेअर बास्केटबॉल या खेळांचा प्रसार केला. व्हीलेअचरवरून फिरणाºया दिव्यांग लोकांना सार्वजनिक ठिकाणी रॅम्प वॉकची सुविधा नाही. सार्वजनिक ठिकाणीही रॅम्प वॉकची नितांत गरज आहे, याचाही प्रसार केला. ‘अॅनेबल रन’ व ‘व्हीआयपी ग्रुप’ या नावाने दिव्यांगांच्या समस्यांबाबत प्रसार आणि जनजागृती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल खेळाडू गीता चौहान, व्हीलिचेअर मॅरेथॉन धावपटू संतोष रांजगणे व रुस्तम इराणी आदी दिव्यांगांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
- राहुल रामुगडे, व्हीलचेअर क्रिकेटर.
कारशेड डेपोचे काम सुरूच...
मेट्रो ३च्या कारशेड डेपोचे काम थांबविण्यात आले आहे, असे बोलले जाते. परंतु कारशेडच्या रॅम्पचे काम सुरू आहे. जो कारशेडचा एक भाग आहे. आरे नक्की वाचलंय की नाही वाचलंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु भेटण्याचा योग जुळून येत नाही. ‘सेव्ह आरे’चा फलक घेऊन जे मुले-मुली उभे होते. त्यांच्या हातातून पोलिसांनी फलक हिसकावून घेतला.
- हर्षद तांबे, पर्यावरणप्रेमी
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंबई मॅरेथॉनच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच, दोन हजार अतिरिक्त पोलीस, ६०० वाहतूक पोलीस, तीन हजार स्वयंसेवक, ३०० वॉर्डन तसेच राखीव पोलीस तैनात होते.
मंत्र्यांची हजेरी
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली होती. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, महापौर किशोरी पेडणेकर आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी बनविलेला रोबो ठरला खास आकर्षण
मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ‘अरमान’ या रोबोने त्याच्या बायोनिक हातासह सर्व धावपटूंचे स्वागत केले. या तरुण समूहाने रोबोटिक्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनांतर्गत हा बायोनिक हात तयार केला आहे.
सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि पुणेस्थित इंडियाफस्ट रोबोटिक्स यांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांना रोबो तयार करणे शक्य झाले. सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या स्किल्स@स्कूल उपक्रमाचा हा भाग आहे. स्किल्स@स्कूल उपक्रमामधून मुलांना व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते़ यामुळे ते रोजगार प्राप्त करू शकतात़, ज्यातून त्यांना प्रत्यक्ष काम मिळवता येईल आणि त्यांना त्यांच्या गरिबीच्या दुष्टचक्रातून मुक्त होता येईल.
सलाम बॉम्बे फाउंडेशन कम्युनिकेशन्सच्या उपाध्यक्ष अदिती पारिख म्हणाल्या, गरीब, पण प्रतिभावान किशोरवयीन मुलांना त्यांची रुची असलेल्या विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सलाम बॉम्बे फाउंडेशन करत असते.
आम्ही त्यांना त्यांची प्रतिभा असलेल्या क्षेत्रांमध्ये कौशल्ये अधिक खुलवण्याची संधी देऊ इच्छितो. दुर्दैवाने ही किशोरवयीन मुले आणि त्यांच्या कुटुंबांसाठी ही क्षेत्रे आवाक्याबाहेर राहतात. म्हणजेच त्यांच्या स्वप्नांना आकार मिळण्यापूर्वीच ती भंग पावतात.
मला अरमानच्या निर्मितीमध्ये हातभार लावण्याचा अत्यंत आनंद होत आहे. आम्ही बायोनिक हातावर काम सुरू करण्यापूर्वी मला रोबोटिक्सबाबत काहीच माहीत नव्हते. मी कधीच विचार केला नव्हता की, मी अशा प्रकारचे यश कधी गाठू शकेन. माझ्यासाठी हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे.
- ओमकार पासलकर, विद्यार्थी