Mumbai Marathon : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या मुली चमकल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 03:54 AM2020-01-20T03:54:21+5:302020-01-20T04:03:23+5:30
अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या महिलांनी चमक दाखविताना रौप्य व कांस्य पदक मिळविले.
मुंबई : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या महिलांनी चमक दाखविताना रौप्य व कांस्य पदक मिळविले. भारतीय रेल्वेच्या पारुल चौधरीने ११ वर्षे जुना स्पर्धा विक्रम नोंदवत दिमाखात सुवर्ण पटकावले. मुंबई कस्टमच्या आरती पाटील आणि नाशिकच्या मोनिका आथरे यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
पारुलने पहिल्या ११ किमी अंतरापासूनच आघाडी घेत, यंदाच्या अर्धमॅरेथॉनमध्ये एकहाती दबदबा राखताना तिने १:१५:३७ अशी विक्रमी वेळ देत महाराष्ट्राच्या कविता राऊतचा स्पर्धा विक्रम मोडला. कविताने २००८ साली येथे सुवर्ण पदक जिंकताना १:१६:३७ अशी वेळ नोंदविली होती. आता या स्पर्धेतील विक्रम पारुलच्या नावावर झाला आहे. त्याच वेळी मूळच्या कोल्हापूरच्या, परंतु सरावासाठी नाशिक गाठलेल्या आरती पाटील या शेतकरी कन्येने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मुंबईत रौप्य जिंकले. तिने १:१८:०३ अशी वेळ दिली. नाशिकची अनुभवी आंतरराष्ट्रीय धावपटू असलेल्या मोनिका आथरेकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती, परंतु दुखापतीतून सावरल्यानंतर आपल्या पहिल्याच मॅरेथॉनमध्ये सहभागी होत मोनिकाने १:१८:३३ अशी वेळ देत कांस्य कमाई केली.
पुरुषांमध्ये सेनादलाच्या तीर्था पून याने १:०५:३९ अशी वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. २०११ साली बी. सी. टिळक याने नोंदविलेला (१:०४:४५) विक्रम स्पर्धा विक्रम मोडण्यात त्याला थोडक्यात अपयश आले. १५ किमीपासून आघाडी घेत, तीर्थाने उत्तराखंडच्या मान सिंग (१:०६:०६) आणि बलियप्पा एबी (१:०७:११) यांना सहज मागे टाकून बाजी मारली. मान सिंग आणि बलियप्पा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले.