Mumbai Marathon 2019 : भारतीय महिलांमध्ये सुधा सिंगची हॅट्ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 03:59 AM2020-01-20T03:59:39+5:302020-01-20T04:00:05+5:30
भारतीय पुरुष गटात आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या धावपटूंनी दबदबा राखताना पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला.
मुंबई : भारतीय पुरुष गटात आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या धावपटूंनी दबदबा राखताना पहिल्या तीन स्थानांवर कब्जा केला. मूळचा आंध्र प्रदेशचा असलेल्या श्रीनू बुगाथा याने सुवर्ण पदक जिंकले. शेर सिंग आणि दुर्गाबहादूर बुधा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले. महिलांमध्ये भारतीय रेल्वेच्या सुधा सिंगने हॅट्ट्रिक नोंदविताना मुंबई मॅरेथॉनमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याच वेळी महाराष्ट्राच्या ज्योती गवते आणि पश्चिम बंगालच्या श्यामली सिंग यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
यंदा टोकियो येथे होणाºया आॅलिम्पिकमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यास पुरुषांसाठी २:११:३०, तर महिलांसाठी २:२९:३० अशी पात्रता वेळ आहे. मात्र, भारतीय गटात श्रीनूने २:१८:४४ अशी वेळ देत बाजी मारली असल्याने त्याला आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याकरिता अधिक मेहनत घ्यावी लागेल, तसेच महिलांमध्ये विजेत्या ठरलेल्या सुधा सिंगलाही आपल्या वेळेत सुधारणा करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. कारण तिने २:४५:३० अशी वेळ देत सुवर्ण पटकावले.
महिलांमध्ये सर्वांचे लक्ष सुधा सिंगवर होते आणि तिने अपेक्षित कामगिरी करताना सलग तिसऱ्यांदा मुंबई जिंकली. दुखापतीनंतर स्पर्धेत धावत असल्याने, यावेळी तिला महाराष्ट्राच्या ज्योती गवतेकडून कडवी टक्कर मिळेल अशी चर्चा होती. मात्र, २२ किमी अंतर पार केल्यानंतर ज्योतीने पाणी घेण्यासाठी आपला वेग काहीसा कमी केला आणि हीच संधी साधत सुधाने मोठी आघाडी घेत २:४५:३० अशा वेळेसह सुवर्ण जिंकले. ‘मी जर पाणी पिण्यासाठी वेग कमी केला नसता, तर कदाचित सुधाताईला मी मागे टाकले असते,’ अशी खंत व्यक्त केलेल्या ज्योतीने २:४९:१४ अशा वेळेसह रौप्य मिळविले. सहाव्यांदा तिने मुंबई मॅरेथॉनच्या पोडियमवर स्थान मिळविले हे विशेष. त्याच वेळी पश्चिम बंगालच्या श्यामली सिंगला २:५८:४४ अशा वेळेसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांमध्ये आर्मी धावपटूंनी एकहाती वर्चस्व राखले. श्रीनूने सुमारे सहा मिनिटांचे मोठे अंतर ठेवून बाजी मारली. भारतीय गटामध्ये श्रीनूने सुरुवातीपासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. त्यामुळे जी काही चुरस होती ती रौप्य व कांस्य पदकासाठीच रंगली. यामध्ये शेर सिंगने रौप्य पटकावताना २:२४:०० अशी वेळ दिली, तर दुर्गाबहादूर बुधाला २:२४:०३ अशा वेळेसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
पाण्याचा विचार केला नसता तर...
मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय महिला गटात परभणीच्या ज्योती गवतेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, यासाठी एक चूक महागात पडल्याचे ज्योतीने ‘लोकमत’ला सांगितले. ज्योतीने सुरुवातीपासून आघाडी राखत सुधाला कडवी टक्कर दिली. ज्योती २२ किमीपर्यंत आघाडीवर होती. मात्र, यावेळी तिने पाण्याची बाटली घेण्यासाठी वेग काहीसा कमी केला आणि याच वेळी सुधाने संधी साधत आघाडी घेत सुवर्ण हॅट्ट्रिक पूर्ण केली. हीच खंत व्यक्त करताना ज्योती म्हणाली की, ‘जर मी पाणी घेण्याचा विचार केला नसता, तर कदाचित मी सुधाला मागे टाकले असते.’
ज्योतीला माझा सलाम!
सुधा सिंगने ज्योती गवतेचे विशेष कौतुक करताना तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीला सलाम ठोकला. सुधाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, पण यासाठी तिने पूर्ण वेळ सरावा देऊन आपली ओळख निर्माण केली. दुसरीकडे ज्योतीनेही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला असला, तरी त्याच वेळी तिने घराची जबाबदारीही सांभाळली आहे. याच गोष्टीचे कौतुक करताना सुधा म्हणाली की, ‘ज्योतीची कामगिरी आमच्यासाठी आश्चर्य आहे. व्यावसायिक धावपटू होण्यासाठी तुम्हाला सरावासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो, परंतु ज्योती घराची जबाबदारी सांभाळून आपला सराव करते. केवळ सरावच नाही, तर ती सातत्याने आघाडीवर राहते. तिची मेहनत पाहून आम्ही थक्क होतो. ती हे सर्व कशा प्रकारे करते हे तिलाच ठाऊक.’