पुरस्कारामुळे पॅरालिम्पिककडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल : देवेंद्र झझारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:58 AM2017-08-05T00:58:14+5:302017-08-05T00:59:19+5:30
देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस झालेला पहिला दिव्यांग खेळाडू देवेंद्र झझारिया याने या पुरस्कारामुळे पॅरालिम्पिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस झालेला पहिला दिव्यांग खेळाडू देवेंद्र झझारिया याने या पुरस्कारामुळे पॅरालिम्पिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
खेलरत्नसाठी भालाफेकपटू झझारिया आणि माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग या दोघांच्या नावाची कालच समितीने शिफारस केली होती. पुरस्कारामुळे सुखावलेला झझारिया म्हणाला, ‘१२ वर्षांआधी हा पुरस्कार मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता.
सुरुवातीच्या काळात आम्हाला फार त्रास झाला. त्यावेळी सन्मान मिळाला असता तर आज देशात पॅरालिम्पिकची स्थिती भक्कम झाली असती. उशिरा का होईना पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहे. यामुळे पॅरालिम्पिकप्रती आणि दिव्यांग खेळाडूंप्रती लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल.’
अथेन्स पॅरालिम्पिक २००४ आणि रिओ पॅरालिम्पिक २०१६ मध्ये विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकणारा झझारिया ‘खेलरत्न’ मिळविणारा पहिलाच पॅरालिम्पिकपटू आहे. जयपूरच्या साई केंद्रात कोच पदावर असलेला झझारियाने पॅरालिम्पिकमध्ये भारताचे भविष्य उज्ज्वल असून २०२० च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदक संख्या दुहेरी आकड्यात पोहोचेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
याचे श्रेय आईला !
बालपणी आईने माझ्या मनातील न्यूनगंड दूर केला. तिने मला मैदानावर आणले. सुदृढ खेळाडूंच्या तुलनेत तू कुठेही कमी नाहीस, असे नेहमी माझ्या मनावर बिंबवायची. आठ वर्षांच्या वयात झाडावर चढताना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे झझारियाचा डावा हात खराब झाला. त्यानंतर हात कापण्यात आला होता. इतर मुले टिंगल करतील या भीतीपोटी मी घराबाहेर पडत नव्हतो. आईने मला खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. अन्य कुणी असते तर जा अभ्यास कर, नोकरी मिळव, असे म्हणाले असते. आईने मात्र मला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज मी जो आहे तो आईमुळेच! आईने प्रेरणा दिली नसती तर इथपर्यंत प्रवासही झाला नसता.