उसैन बोल्टच्या कारकीर्दीची 'कांस्य'पदकाने सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 02:42 AM2017-08-06T02:42:11+5:302017-08-06T06:14:16+5:30
जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्टने आपल्या कारकीर्दीची सांगता 'कांस्य'पदकाने केली. आतापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे.
लंडन, दि.6 - जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्टने आपल्या कारकीर्दीची सांगता 'कांस्य'पदकाने केली. आतापर्यंतच्या कारकीर्दीत उसैन बोल्टला मिळालेले हे पहिले कांस्य पदक आहे, या आधीच्या प्रत्येक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे.
अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या कारकीर्दीतून निवृत्त होण्यापूर्वी सुवर्ण पटकावण्याचा निर्धार उसैन बोल्टने केला होता. मात्र, लंडन येथील विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीतील पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनने सुवर्ण पदाकावर कब्जा केला. त्यामळे उसैन बोल्टला कांस्य पदाकावर समाधान मानावे लागले. तर, अमेरिकेच्याच ख्रिस्तियान कोलमनने रौप्य पदक पटकावले. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत या अंतिम फेरीत जस्टीन गॅट्लीनने 9.92 सेंकद नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. ख्रिस्तियान कोलमनने 9.94 सेकंदाची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक मिळवला. तर, उसैन बोल्टची 9.95 सेकंदाची वेळ नोंदवत तिस-या क्रमांक मिळवला. या शर्यतीत जरी उसैन बोल्टला सुवर्ण मिळाले नसले, तरी त्याच्या चाहत्यांनी मात्र तो मैदानातून बाहेर जाईपर्यंत त्याचा जयघोष सुरुच ठेवला होता.
उसैन बोल्टने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये सहा सुवर्ण तर विश्व चॅम्पियनशिपमध्ये अकरा विजेतेपदांची कमाई केली आहे. 2012 च्या लंडन आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने तीन-तीन सुवर्णपदके कमावली आहेत. 9.58 सेकंदात 100 मीटर, तर 19.19 सेकंदात 200 मीटर अंतर धावून पार करण्याचा विश्वविक्रमही उसैन बोल्टने 2009 च्या बर्लिनमधील स्पर्धेत नोंदवला. याचबरोबर 2008 च्या ऑलिम्पिकमधील चार बाय 100 मीटर रिले शर्यतीत त्याचा सहकारी नेस्ता कॅन्टर हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जमैकाला मिळालेले हे विजेतेपद काढून घेण्यात आले होते.