जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा : पदक वितरण सोहळ्यातही गॅटलिनचे हुटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:14 AM2017-08-08T02:14:29+5:302017-08-08T02:14:51+5:30
येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १00 मीटरची शर्यत जिंकून वेगाचा नवा राजा बनलेल्या अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनला आनंदाचे क्षण काही उपभोगता येईना झालेत.
लंडन : येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १00 मीटरची शर्यत जिंकून वेगाचा नवा राजा बनलेल्या अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनला आनंदाचे क्षण काही उपभोगता येईना झालेत. शर्यत जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली होती. त्याला पदक वितरण सोहळ्यात पुन्हा अपमानाला सामोरे जावे लागले. तो पोडीयमवर आला असता प्रेक्षकांनी पुन्हा हुटिंग केले, तर तिसºया क्रमांकावरील बोल्टचा जयजयकार केला.
डोपिंगच्या आरोपाखाली दोन वर्षांची बंदीची शिक्षा भोगून परतलेल्या गॅटलिनने उसेन बोल्टला त्याच्या शेवटच्या शर्यतीत हरवून १00 मीटर स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. या शर्यतीच्या पदक वितरण सोहळ्यात कांस्यपदक मिळवणाºया बोल्टचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्याच्या थाटात स्वागत केले; परंतु सुवर्णपदक विजेत्या गॅटलिनच्या नावाची घोषणा होताच प्रेक्षकांनी जोरदार हुटिंग केले. गॅटलिनचे उपस्थित चाहते मात्र त्याचे टाळ्या वाजवून स्वागत करीत होते. गॅटलिनने हुटिंगकडे दुर्लक्ष करून पोडीयमवर कोणतेही भाव चेहºयावर येऊ दिले नाहीत. तिघांनी सामुदायिक फोटोसेशनही केले. (वृत्तसंस्था)
अमेरिकेची बोवी सर्वांत जलद महिला धावपटू
अमेरिकेच्या टोरी बोवीने जगातील सर्वांत जलद महिला धावपटूचा सन्मान पटकावला. याबरोबरच तिने गेल्या वर्षी हुकलेल्या आॅलिम्पिकाची कसर भरून काढली. येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बोवीने १0.८५ सेकंदांची वेळ नोंदवून हा किताब पटकावला.
तिने शेवटच्या सेकंदात आयव्हरी कोस्टच्या मारी जोसी टा लाउ हिला मागे टाकले. शर्यत संपल्यानंतर बोवी ट्रॅकवर कोसळली, तर मारी जोसी जल्लोष करीत होती. परंतु स्क्रिनवर बोवीला विजेती घोषित करण्यात आले. मारी जोसीने १0.८६ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. नेदरलँडच्या डेफने शिपर्सला १0.९६ वेळेवर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
रिओ आॅलिम्पिकची सुवर्णपदक विजेती अॅलेन थॉम्पसन पाचव्या स्थानावर राहिली. तिने १0.९८ सेकंदाची वेळ नोंदवली.