बापरे ! महापालिकेत वर्षभरात काढल्या जातात १२ लाख संगणक प्रिंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 03:44 PM2021-08-23T15:44:47+5:302021-08-23T17:18:29+5:30

दरवर्षी महापालिकेचे वेगवेगळे विभाग जवळपास १२ लाख प्रिंट कशासाठी काढतात, हा संशोधनाचा विषय आहे.

12 lakh computer prints are issued in Aurangabad Municipality corporation throughout the year! | बापरे ! महापालिकेत वर्षभरात काढल्या जातात १२ लाख संगणक प्रिंट

बापरे ! महापालिकेत वर्षभरात काढल्या जातात १२ लाख संगणक प्रिंट

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना संसर्गामुळे अनेक विकासकामे ठप्प, तरी...कर्मचाऱ्यांना आता लिहिण्याची सवयच राहिली नाही.

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे महापालिकेत ९५ टक्के विकासकामे बंद आहेत. सध्या कार्यालयीन, अत्यावश्यक कामेच सुरू असताना देखील वर्षभरात तब्बल १२ लाख संगणकावरील प्रिंट काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रिंट काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला तब्बल १५०० टोनर लागतात. २० लाख कागद लागतो. प्रत्येक संगणकावर कामकाजासाठी १५ हजार पगाराचा एक संगणकचालक नेमला आहे. फक्त संगणकीय कामकाजासाठी महापालिकेला दरवर्षी किमान चार कोटी रुपये खर्च करावा लागतोय.

अत्याधुनिक साधन सामग्रीचा वापर केल्यास वेळेची बचत होईल. खर्च कमी होईल म्हणून प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वेळोवेळी संगणक खरेदी केले. प्रत्येक विभागात किमान १० पेक्षा अधिक संगणक देण्यात आले. बहुतांश संगणकाला प्रिंट देण्याची सोयही आहे. एप्रिल २०२० पासून महापालिकेत प्रशासक आहेत. राजकीय मंडळींचा हस्तक्षेप जवळपास बंद झालाय. पूर्वी महापालिकेच्या वेबसाईटवर एकाचवेळी किमान १५० पेक्षा अधिक विकासकामांचे टेंडर निघत होते. आता ही संख्या फक्त १५ ते २० पर्यंत आली आहे. दोन वर्षांपासून ९५ टक्के विकासकामे बंद असून, अत्यंत आवश्यक आणि मेंटेनन्सचीच कामे होत आहेत. त्यानंतरही प्रशासकीय खर्च कमी झालेला दिसत नाही.

महापालिकेला दरवर्षी संगणक प्रिंटरचे जवळपास १५०० टोनर लागतात. ओरिजनल टोनर ५ हजार ५०० रुपयांना येतो. त्यामुळे चायना बनावटीचा ५५० रुपयांचा टोनर वापरला जातो. एका टोनरमध्ये किमान ८०० प्रिंट निघायला हव्यात, असा दावा कंपनीचा आहे. दरवर्षी महापालिकेचे वेगवेगळे विभाग जवळपास १२ लाख प्रिंट कशासाठी काढतात, हा संशोधनाचा विषय आहे. प्रिंट काढण्यासाठी २० लाख कागदांचा वापर होतो, असाही दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. एका कागदाच्या रिमची किंमत २४० रुपये आहे. या रिममध्ये ५०० कागद असतात. हा झाला सर्व तांत्रिक खर्च. संगणक हाताळण्यासाठी सध्या २०० संगणक ऑपरेटर कार्यरत असून, प्रती ऑपरेटर १५ हजार रुपये याप्रमाणे त्यांच्या एका महिन्याच्या पगारवर ३० लाखांचा खर्च होतो. संगणकीय वापरावर प्रशासनाचे वर्षाला चार कोटी रुपये खर्च होत आहेत.

सबमिशन लिहिणे जवळपास बंद
महापालिकेत पूर्वी प्रत्येक फाईलवर तांत्रिक विभागांमधील कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून वरिष्ठांपर्यंत, लिपिक संवर्गात सबमिशन लिहिण्याची पद्धत होती. आता पेनाने सबमिशन लिहिणे जवळपास बंदच झाले आहे. प्रत्येक फाईलमध्ये संगणक प्रिंटच काढली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता लिहिण्याची सवयच राहिली नाही.

अनेक प्रकारचे टोनर
बाजारात अनेक प्रकारचे टोनर उपलब्ध आहेत. साधारण एका टोनरमध्ये ८०० प्रिंट सहजपणे निघतात. मागील काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी संगणकाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे टोनरची मागणीही वाढतेय.
- स्वप्निल बाहेती, संगणक विक्री तज्ज्ञ

Web Title: 12 lakh computer prints are issued in Aurangabad Municipality corporation throughout the year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.