'श्रेयवादात पडणार नाही, यासाठी केंद्र सरकारचे आभार', चंद्रकांत खैरे यांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:28 PM2023-02-24T21:28:44+5:302023-02-24T21:28:49+5:30
औरंगाबाद शहराचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे.
मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याची मागणी सुरू होती. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला, त्यानंतर आता केंद्रानेही या नामकरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे दोन्ही शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, या निर्णयावर माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.
श्रेयवादात पडणार नाही, पण...
माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. सर्वप्रथम बाळासाहेबांनीच संभाजीनगर नावाची भूमिका मांडली होती. त्यानंतर आम्ही 95 आणि 96 साली हा प्रस्ताव मान्य केला, मात्र न्यायालयात प्रकरण अडकलं. आम्ही श्रेयवादात पडणार नाही, पण आता लवकरच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजीमहाराजांराचे नाव द्यावं हीच उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. बाळासाहेब ठाकरे यांची मागणी अनेक वर्षानंतर मान्य झाली यामुळे केंद्र सरकारचे आभार, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
केंद्र सरकारचे अभिनंदन आणि आभार
अंबादास दानवे म्हणाले की, 9 मे 1988 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर या नावाची घोषणा केली होती. दोन वेळा शिवसेनेच्या महापौरांनी महानगरपालिकेकडून हा प्रस्तावही पाठवला होता, मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला मान्य केलं. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.