हव्यातशा सेल्फिचा मोह नडला; तरुण अजिंठा लेणीतील सप्तकुंडात कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 06:19 PM2021-09-16T18:19:29+5:302021-09-16T18:23:09+5:30
स्थानिक लेणीपूर, सावरखेडा, पिंपळदरी येथील ग्रामस्थ, सुरक्षा रक्षक आणि पुरात्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाचवला जीव
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा ( Ajantha Cave ) लेणीतील धबधब्याजवळ सेल्फी घेण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना आज दुपारी घडली. दैवबलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ, सुरक्षा रक्षक आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
हिमांशू रॉय असे सेल्फी घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. जळगाव येथून काही तरुण आज जगप्रसिद्ध अजिंठा लेण्याच्या दर्शनासाठी सकाळीच आले होते. लेणी पाहिल्यानंतर काही मित्रांसोबत हिमांशू लेणीजवळील धबधब्याच्या समोरील व्यू-पॉइंटवर गेला. येथे धबधब्यासोबत हवातसा सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात हिमांशू व्यू-पॉइंटवरून खाली उतरून डोंगराच्या टोकावर आला. येथून सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन हिमांशू खाली सप्तकुंडात कोसळला.
हिमांशू कोसळताच त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून स्थानिक लेणीपूर, सावरखेडा, पिंपळदरी येथील ग्रामस्थ, सुरक्षा रक्षक आणि पुरात्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी लागलीच दोरी आणि गळ खाली टाकून हिमांशूला अथक प्रयत्नाने बाहेर काढले. किरकोळ इजा झालेली आहे. दैवबलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.