मुख्यमंत्री ठाकरे भर सभेत माझ्या कानात म्हणाले, 'काँग्रेसवाले खूप त्रास देतात... आपण बसून बोलू'; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:32 PM2021-09-17T12:32:37+5:302021-09-17T12:32:57+5:30
Raosaheb Danve: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला मोठा दावा
Raosaheb Danve: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील भाजपा नेत्यांचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या कार्यक्रमानंतर रावसाहेब दानवे यांनीही मोठं विधान केलं आहे. काँग्रेसवाले खूप त्रास देतात एकदा या आपण बसून बोलू, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी मला कानात सांगितलं आहे, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
'व्यासपीठावर उपस्थित माझे भावी सहकारी...', दानवे व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना भाजपा मंत्र्यांचा उल्लेख एकत्र आलो तर भावी सहकारी असा केला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या कार्यक्रमानंतर रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत एक मोठा दावा केला आहे.
रावसाहेब दानवेंनी भर सभेत मुख्यमंत्री ठाकरेंकडे पाठिंबा मागितला, उद्धव ठाकरेंनी शब्दच दिला!
मुख्यमंत्र्यांनी असं विधान का केलं याबाबत विचारण्यात आलं असताना दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना आलेल्या अनुभवावरुनच ते असं म्हणाले असतील, असं दानवे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांचा अनुभव काही चांगला राहिलेला नाही. त्यांना काम करताना त्रास होतोय हे दिसतंय म्हणूनच ते आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत, असं दानवे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कानाता सांगितलं...एकदा बसून बोलू!
मुख्यमंत्री ठाकरे यांनी भर सभेत मला सांगितलंय की हे काँग्रेसवाले मला त्रास देतात..तुम्ही एकत्र या आपण बसून बोलू आणि हे सांगताना व्यासपीठावर बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. त्यांनीही हे ऐकलं आणि तेही हसले, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. दानवेंच्या विधानामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघण्याची शक्यता आहे.
आम्ही पूर्व मित्रच, आता पुन्हा मित्र होऊ!
भाजपा आणि शिवसेना हे पूर्वीचे मित्र होते. पण शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला. असं असलं तरी शिवसेनेनं तयारी दाखवली तर भाजपा नेहमीच समविचारी पक्षाचं स्वागतच करेल. आम्ही पूर्व मिक्ष होतोच, आता पुन्हा मित्र होऊ शकतो, असंही दानवे म्हणाले.