कोरोना नियम मोडणाऱ्या सलून चालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा ठाण्याबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 03:08 PM2021-04-14T15:08:19+5:302021-04-14T15:11:46+5:30
यानंतर मृताच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी करत प्रेतासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
औरंगाबाद: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या कठोर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका सलूनचालकाचा पोलीस कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 12 वाजे दरम्यान उस्मानपुरा येथे घडली. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन जबाबदार पोलिसांवर कारवाईची मागणी करत प्रेतासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुकान उघडले म्हणून उस्मानपूरा येथील एका हेअर सलून चालकावर 12 वाजेच्या दरम्यान पोलीस कारवाई करण्यात होती. दरम्यान, त्याला पोलीस ठाण्यात नेत असतांना तो खाली पडुन जखमी होऊन मरण पावला. नातेवाईकांनी प्रेत उस्मानपुरा ठाण्यात नेले . फेरोज खान कदीर खान असे मयताचे नाव . फिरोज खान यांना मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकानी केला. फेरोज यांना मारहाण करणा ऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी करीत हजारो नागरीक आणि नातेवाईक उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर जमले आहेत . ठाण्याच्या दारात प्रेत ठेवून आंदोलन सुरू केले . जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही, तोपर्यंत प्रेत येथून उचलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला .
या घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकारी आणि दंगा काबू पथकासह दाखल झाले. डीसीपी दिपक गिऱ्हे , एसीपी रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव , संतोष पाटील, दिलीप तारे आणि , पोंनि रामेश्वर रोडगे ,सपोनि घनश्याम सोनवणे हे पोलीस ठाण्यात नातेवाईकांची समजूत काढत आहेत.