coronavirus : धक्कादायक ! घाटीतून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 08:40 AM2020-06-09T08:40:16+5:302020-06-09T09:23:54+5:30
मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास रुग्ण पळाला
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेला गणेशनगर येथील ३८ वर्षीय रुग्णाने वॉर्डातील डॉक्टर, परिचारीका आणि सुरक्षा रक्षकांना चमका देत पळ काढला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी पाऊणे सातच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत तक्रार देण्यात आली असल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या कोविड सेंटरमधून रविवारी रात्री दोन कोरोना बाधीत कैदी पळाले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागला नाही. त्यानंतर घाटी रुग्णालयातून एका बाधीत रुग्णाने पलायन केल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घाटी प्रशासनाने दिलेल्या माहीतीनुसार, रविवारी (दि. ७) गणेशनगर येथील ३८ वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यावर डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणजेच मेडिसिन इमारतीच्या आयसीयूत उपचार सुरु होते. श्वासनचा त्रास जाणवत असल्याने त्याला ऑक्सीजन लावण्यात आलेला होता. मंगळवारी पहाटे या रुग्णाने परिचारीका, कर्मचारी, डॉक्टर कामात असतांना वॉर्डातून पलायन केले. विषेश म्हणजे त्याने या इमारतीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनाही चकमा दिला. सकाळच्या फेरीतील औषधी देतांना रुग्ण वॉर्डात नसल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध झाली. त्यानंतर बेगपुरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घाटीकडून तक्रार प्राप्त झाल्याचे बेगमपुरा ठाण्याकडून सांगण्यात आले.
यापुर्वीही चौदा रुग्णांनी घातली हुज्जत
दोन प्रसून महिला रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर घाटीतून निघून गेल्याची घटना आठवडाभरापूर्वी घडली होती. त्यावेळी नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जतही घातली होती. प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यावर रुग्ण पुन्हा भरती झाले. जवळपास चौदा रुग्णांसोबत डॉक्टरांना असे अनुभव आले आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर एकतर शंका उपस्थित करतात. किंवा घरी निघून जातात. याबाबत अनेक समज, गैरसमज रुग्णांत असल्याने उपचार करावे की रुग्णांना आवरावे असा प्रश्नही घाटी प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
दोन पॉझिटिव्ह कैदीही झाले पसार
महापालिकेच्या कोविड सेंटरमधून रविवारी (ता. सात ) रात्री २ कोरोना बाधित कैदी पळाले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागला नाही. त्यानंतर घाटी रुग्णालयातून एका बाधीत रुग्णाने पलायन केले. असे पॉझिटिव्ह रुग्ण पसार होत असल्याने संसर्गाचा धोकाही त्यांच्यामुळे वाढू शकतो. त्यामुळे रुग्ण उपचार सुरु असलेले ठिकाण सोडून कुठेही बाहेर जाणार नाही यासाठी ठोस उपाय करण्याची गरज आहे.