coronavirus : अलगीकरणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; कोरोनामुळे वडिलानंतर मुलाचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:46 PM2020-05-23T19:46:37+5:302020-05-23T19:49:38+5:30
कुटुंबातील लहान मुलाने दोघांवरही केले अंत्यसंस्कार केले.
औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी बुधवारी वडील दगावले. त्यानंतर शुक्रवारी मोठ्या भावाचा मृत्यू झाला. कोरोनामुळे दोन दिवसांत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. सर्व कुटुंबीय बाधित असल्याने ते वेगवेगळ्या ठिकाणी दाखल आहेत. त्यामुळे कुटुंबातील लहान मुलाने वडील व मोठ्या भावावर अंत्यसंस्कार केले.
इंदिरानगर बायजीपुरा येथील या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिवारातील दहा जण पॉझिटिव्ह असल्याने सर्व जण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. नातेवाईक असलेल्या नगरसेवकाने दिलेल्या माहितीनुसार, घाटीत दाखल केलेल्या इंदिरानगर बायजीपुरा येथील ८० वर्षीय वृद्धाचा १४ मे रोजी स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांचा मोठा मुलगा, तसेच त्याची पत्नी, दोन्ही मुले, दोन्ही सुना, दोन नातवंडे, असे आठ जण पॉझिटिव्ह आले, तर सातारा परिसरात राहणारा लहान मुलगाही पॉझिटिव्ह आला. ते सर्व जण अलगीकरणात उपचार घेत होते. दरम्यान, वृद्धाचा २० मे रोजी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. त्यावेळी मोठ्या मुलाला अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही.
या घटनेनंतर दोनच दिवसांत घाटी रुग्णालयात त्या वृद्धाच्या मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला. तेव्हा त्याच्याही दोन्ही मुलांना अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. मृत वृद्धाच्या लहान मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला; परंतु वडिलांचा अंत्यसंस्कार केल्यामुळे शुक्रवारी सकाळी पुन्हा त्याने तपासणीसाठी स्वॅब दिला. दरम्यान, तो अलगीकरण कक्षात भरती झाला, तोच मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी कळली. त्याने विनंतीवरून परवानगी काढली व कागदोपत्री कारवाई पूर्ण केली. नातेवाईक असलेले नगरसेवकही क्वारंटाईन आहेत. त्यांनी आमदार, अधिकाऱ्यांना, सहकारी नगरसेवकांना फोन करून मदत पोहोचवली. घाटीतील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने त्यासाठी समन्वय साधला. त्यामुळे ५५ वर्षीय व्यक्तीवर रात्री ८ वाजता सेंट्रल नाका येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.