Dr. Rajan Shinde Murder : डोक्यात घातलेले डंबेल, रक्त पुसलेले टॉवेल विहिरीत सापडले, चाकूचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 10:49 AM2021-10-18T10:49:46+5:302021-10-18T12:31:20+5:30
Dr. Rajan Shinde Murder : पोलिसांनी तयार केलेल्या सर्व घटनाक्रमातील महत्त्वाचा धागा हत्येसाठी वापरलेले शस्त्र होते.
औरंगाबाद : राज्यभर गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे खून ( Dr. Rajan Shinde Murder ) प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांना खुनासाठी वापरलेले संशयित शस्त्र डंबेल आणि रक्त पुसण्यासाठी वापरलेली टॉवेल विहिरीत सापडले ( Dumbbells, blood-stained towel found in well) . धारदार शास्त्राचा शोध सुरु आहे. डॉ. शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अतिशय बारकाईने काही पुरावे गोळा केले आहेत. त्यासाठी विविध पथके तैनात केली होती. त्याची सुयोग्य मांडणी केली असून, विहिरीतून सर्व शस्त्र बाहेर काढल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.
पोलिसांनी तयार केलेल्या सर्व घटनाक्रमातील महत्त्वाचा धागा हत्येसाठी वापरलेले शस्त्र होते. यामुळे आरोपींनी हत्या केल्यानंतर शस्त्रे टाकलेल्या विहिरीवर शहरातील टॉपचे पोलीस अधिकारी दिवसभर ठांण मांडून होते. विहिरीतील पाणी उपसण्यात आले. पण सायंकाळ झाल्यामुळे गाळ काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. यातच पाऊस झाल्यामुळे विहिरीतील पाणीसाठा वाढला. त्यामुळेही विलंब झाला. मात्र आज सकाळी पोलिसांना खुनासाठी वापरले संशयित डंबेल आणि रक्त पुसलेले टॉवेल सापडले आहे. पोलीस चाकूचा शोध घेत आहेत. सर्व शस्त्र मिळाल्यानंतर पंचानामा करून आरोपीस ताब्यात घेण्यात येणार आहे. यामुळे अत्यंत गुंतागुतीच्या या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
खटला ऐतिहासिक होणार
डॉ. शिंदे खून प्रकरणात पोलीस तपासामध्ये आतापर्यंत एकच संशयित निष्पन्न झालेला आहे. त्या संशयिताला कायद्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे. या संशयितांची सर्व कुंडलीच पोलिसांनी हस्तगत केली आहे. हा संशयित मागील अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर काय सर्च करतो, वर्तवणूक कशी होती, शाळा, विद्यापीठातील त्याचे रेकॉर्ड काय आहे याची इत्यंभूत माहिती जमा करण्यात आली आहे. देशभर गाजलेल्या आणि कायद्याला आव्हान दिलेल्या दिल्लीतील निर्भया खटल्याप्रमाणे या खुनाच्या घटनेत क्रूरता भरलेली आहे. त्या दृष्टीने पोलीस तयारी करीत आहेत. विहिरीत शस्त्र मिळाल्यास खटला ऐतिहासिक होणार असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे.