शिक्षण क्षेत्र सुन्न! प्राध्यापकाचा गळा, हाताच्या नसा कापून निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 09:08 AM2021-10-11T09:08:30+5:302021-10-11T09:10:38+5:30
Murder in Aurangabad : पहाटे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
- राम शिनगारे
औरंगाबाद : मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (वय ५१) यांची घरात गळा, कान, दोन्ही हातांच्या मनगटाजवळील नसा कापल्यानंतर डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी पहाटे दीड ते अडीच वाजेदरम्यान घडली. खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून होते.
मुकुंदवाडी पोलिसात विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातील प्राध्यापिका डॉ. मनीषा राजन शिंदे (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पती डॉ. राजन, मुलगी चैताली (वय २०), मुलगा रोहित (वय १७), सासरे हरिभाऊ आणि सासू चंद्रकला यांच्यासह प्लॉट नं. ७९, संत तुकोबानगर, एन २, सिडको येथील घरात राहतात. रविवारी सायंकाळी ९.३० वाजता घरातील सासू-सासरे जेवण करून त्यांच्या खोलीमध्ये झोपी गेले. मुलगी, मुलगा जागेच होते. राजन हे मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेलेले होते. ते रात्री ११.३० वाजता बाहेरून जेवण करून घरी आले. त्यानंतर दोघे पती-पत्नी एक वाजेपर्यंत टीव्ही पाहत गप्पा मारीत बसले. मनीषा एक वाजता झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेल्या. तसेच त्यांनी मुलांना लवकर झोपण्यास सांगितले. पती राजन हे हॉलमध्ये टाकलेल्या अंथरुणावर पडून टीव्ही पाहत होते.
मनीषा सकाळी ६.१५ वाजता उठून हॉलमध्ये आल्या तेव्हा त्यांना डॉ. राजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. तेव्हा शेजारी मुलगी व मुलगाही नव्हता. थोड्यावेळाने मुलगा व मुलगी बाहेरून घरात आले. त्यांनी वडिलांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना कळविली होती. काही वेळातच मुकुंदवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.