नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 07:36 PM2021-10-07T19:36:22+5:302021-10-07T19:41:04+5:30
Janshatabdi Express : या पूर्वी रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते.
औरंगाबाद : सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणारी जनशताब्दी एक्स्प्रेस यापूर्वी जालन्यापर्यंत विस्तारित करण्यात आली. नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी उत्पन्न वाढीसाठी आता या रेल्वेचा विस्तार थेट हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत. (Extension of Janshatabdi Express to Hingoli)
प्रारंभी औरंगाबाद ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली होती. औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रवाशांना एका दिवसात मुंबईतील कामे आटोपून परत येण्याच्या दृष्टीने ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरते. सुरुवातीला ही रेल्वे औरंगाबाद ते सीएसएमटीपर्यंत धावत होती. मात्र, काही कालावधीनंतर ही रेल्वे दादरपर्यंतच धावू लागली. अशातच या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते. काही मोजक्या प्रवाशांसह या रेल्वेचा औरंगाबादपर्यंत प्रवास होतो. औरंगाबादहून या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. ही रेल्वे पुन्हा एकदा सीएसएमटीपर्यंत धावत आहे. पूर्वी सकाळी ६ वाजता सुटणारी ही गाडी आता सकाळी साडेनऊ वाजता सुटते. या सगळ्यात आता या गाडीचा विस्तार हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वेकडून त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवीन रेल्वे देता येईल
हिंगोलीहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करता येऊ शकते. त्याचा रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत केला, तर त्याला कोणाचा विरोध राहणार नाही, असे वाटते. कारण विस्तार करताना या रेल्वेला बोगी वाढविण्यात येतील.
- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना