माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:48 PM2021-09-27T16:48:38+5:302021-09-27T17:08:53+5:30
हर्टफोर्डशाइर विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर त्याने शिक्षणासोबतच पार्टटाइम होम डिलिव्हरी सर्व्हिसचे काम केले.
औरंगाबाद : शहरातील जाबिंदा इस्टेट भागातील एका गरीब कुटुंबातील हरदीपसिंघ नरेन्द्रसिंघ सिलेदार या युवकाने मोठ्या कष्टाने लंडन विद्यापीठात बीएससी कॉम्प्युटर (नेटवर्क) ही पदवी मिळवून मोठे यश संपादन केले. लंडन येथील हर्टफोर्डशाइर विद्यापीठाने नुकतेच प्रथम श्रेणी स्नातक उपाधी प्रदान करून हरदीपसिंघ सिलेदार यांना सन्मानित केले. हरदीपने लोकवर्गणीतून हे यश मिळविले हे विशेष.
मुलाच्या या यशाने त्याचे वडील नरेन्द्रसिंघ सिलेदार कुटुंबीयांचे आनंद गगनात मावेनासे झाले. हरदीपने २०१८ मध्ये मोठ्या प्रयत्नाने इंग्लंड गाठले होते. त्यांच्या वडिलांनी बँकेचे लोन काढून, शीख समाजाच्या संस्था व प्रतिष्ठित नागरिकांकडून लोकवर्गणीच्या माध्यमातून, उसने पैसे काढून त्याला शिक्षणासाठी पाठवले होते.
हर्टफोर्डशाइर विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर त्याने शिक्षणासोबतच पार्टटाइम होम डिलिव्हरी सर्व्हिसचे काम केले. वडिलांनी रात्रंदिवस कार चालवून अभ्यासासाठी लागणारी फी व इतर खर्चाची पूर्तता केली. कोरोना संक्रमणामुळे सर्वत्र लॉकडाऊन होते. हरदीपसमोर उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला. अनेक महिने संघर्षास तोंड देऊन त्याने अभ्यास सुरूच ठेवला. शेवटी प्रथम श्रेणीत त्याने पदवी मिळवली.