उद्योगनगरीत गुंड, 'ब्लॅकमेलर' रोखा; वाळूज एमआयडीसीतील उद्योजकांची प्रशासनाकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 12:08 PM2021-08-11T12:08:17+5:302021-08-11T12:30:54+5:30
कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे.
वाळूज महानगर : औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरी करून उद्योजकांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार वाढतच चालल्याने उद्योग बंद पडण्याची भीती उद्योजकांतून वर्तविली जात आहे. गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने वेळीच आवर घालण्याची गरज असल्याचा सूर उद्योजकांकडून आळवला जात आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गत दीड-दोन वर्षांपासून उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकांची आर्थिक घडी विसकटली आहे. प्रतिकूल परिस्थिती असूनही उद्योग टिकवून ठेवण्यासाठी उद्योजकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, औद्योगिक क्षेत्रात गत दोन-तीन वर्षांपासून गुंडगिरी व ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढले आहेत. कंपनीत काम करताना कामगार जखमी झाल्यास किंवा अपघात झाल्यास गुंडगिरी करणारे कंपनीतील अधिकारी व उद्योजकांना धमक्या देतात. याशिवाय विविध धार्मिक उत्सव, महापुरुषांची जयंती व सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली गुंडगिरी करणारे कारखान्यात येऊन पैसे, तसेच अन्नधान्याची मदत करण्यासाठी दबाव आणतात. उद्योजकांनी मदतीस नकार देताच कंपनीच्या विरोधात शासकीय कार्यालयात तक्रारी करून उद्योजकांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो.
औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारा
वाळूज उद्योगनगरीचा झपाट्याने विस्तार झाला असून, लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने न्याय मिळण्यास विलंब होतो. या भागात नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज आहे.
- नारायण पवार (अध्यक्ष मसिआ संघटना)
गुंडांवर कडक कारवाई करा
कंपनीत काम करताना कामगाराचा अपघात झाल्यास अथवा काही घटना घडल्यास गुंडगिरी व दहशत पसरवून उद्योजक व कारखान्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात. कामगारांवर अन्याय झाल्यास शासकीय यंत्रणेकडे दाद मागण्याऐवजी उद्योजकांना विनाकारण त्रास दिला जातो. या गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.
- अजय गांधी (उद्योजक)
उद्योजकांना सुरक्षा देण्याची गरज
उद्योगनगरीमुळे हजारो कामगारांना रोजगार मिळाला. शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. गत काही दिवसांपासून औद्योगिक क्षेत्रात गुंडगिरीचे प्रमाण वाढल्याने उद्योजकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. या भागातील गुंडगिरी मोडून उद्योजकांच्या सुरक्षेवर भर देण्याची आवश्यकता आहे.
- अनिल पाटील (उपाध्यक्ष- मसिआ संघटना )