जायकवाडी ६३ टक्क्यांवर; मराठवाड्यातील उर्वरित प्रकल्पांत ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:01 PM2019-08-08T12:01:23+5:302019-08-08T18:59:12+5:30
आठही जिल्हे अद्याप कोरडेच असताना औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्प बुधवारी ६३ टक्क्यांवर पोहोचला. समाधानकारक पाऊस न झाल्याने जायकवाडी वगळता जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे.
पैठण (जि. औरंगाबाद) : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरण समूहातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बुधवारी रात्री ९ वाजता जायकवाडी धरणाने ६३ टक्क्यांची पाणीपातळी ओलांडली. सायंकाळी ७ वाजता ६१.४१ टक्के जलसाठा झाला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून ५७४८, निळवंडे धरणातून १३६११ व ओझर वेअरमधून प्रवरेच्या पात्रात १९९३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात बुधवारी सकाळी ७ वाजता १७७७७ क्युसेक आवक सुरू होती. हळूहळू ती दुपारी १२ वाजता १३३३३२ क्युसेकपर्यंत घटली, तर सायंकाळी ४ वा. ९७७८२ क्युसेक एवढी झाल्याची माहिती धरण नियंत्रण कक्षातून सहायक अभियंता संदीप राठोड, बुद्धभूषण दाभाडे, आर. ई. चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधणे यांनी सांगितली. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी बुधवारी सायंकाळी ७ वा. १५१४.१७ फूट झाली होती. जायकवाडी धरणात एकूण जलसाठा २०७१.४८७ दलघमी (७३.१४ टीएमसी) झाला असून, यापैकी १३३३.३८१ दलघमी (४७.०८ टीएमसी) जिवंत जलसाठा आहे.
हिंगोली जिल्ह्यात केवळ ८ मि.मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत मागील चोवीस तासांत झालेल्या पावसाची नोंद ८.0२ मि.मी. एवढी झाली.
हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे वार्षिक सरासरीच्या ४0 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान झाले आहे. गेल्या २४ तासांत हिंगोलीत ५ मि.मी., कळमनुरी ८.८३ मि.मी., सेनगाव ७.३३ मि.मी., वसमत ११.७१ मि.मी., औंढा नागनाथ ७.२५ मि.मी. अशी नोंद झाली आहे. जिल्ह्याची सरासरी ८.0२ मि.मी. एवढी आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. मात्र कोणत्याही भागात दमदार पावसाने हजेरी लावली नाही. जिल्ह्यातील येलदरी व सिद्धेश्वर ही दोन्ही धरणे मृतसाठ्यातच आहेत. सिद्धेश्वरच्या मृतसाठ्यात १६९ दलघमीचा संचय होवू शकतो. प्रत्यक्षात ११९ दलघमी साठा आहे. येलदरीत १२५ दलघमी पाणी मृतसाठ्यातच साठते. या धरणात १0५ दलघमी प्रत्यक्ष साठा आहे. इसापूर धरण मात्र मृतसाठ्याबाहेर निघाले. या धरणात मृतसाठ्यातील ३२५ तर उपयुक्त पाणीसाठा ९७.७ दलघमी एवढा आहे.
उस्मानाबाद रिमझिम कायम; प्रकल्प कोरडेच
दोन महिने उलटले तरी जिल्ह्यात अद्याप एकही दमदार पाऊस झाला नाही़ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली रिमझिम बुधवारीही कायम राहिली़ जिल्ह्याच्या सरासरीच्या केवळ ३० टक्केच (२२४ मि.मी.) पाऊस नोंदला गेला आहे़ उमरगा व लोहारा तालुक्यात बुधवारी चांगला पाऊस झाला. उर्वरित भागात अधूनमधून रिमझिम पाऊस झाला़ जलसाठ्यात मात्र किंचितही वाढ झालेली नाही़ सर्वात मोठा सीना कोळेगाव प्रकल्प कोरडाठाक आहे़ माकणीच्या तेरणात १४ दलघमी व कळाबजवळील मांजरा प्रकल्पात ७ दलघमी साठा असला तरी उपयुक्त साठा शुन्यात आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण १७ मध्यम प्रकल्प आहेत़ त्यापैकी १० कोरडे असून ७ प्रकल्प जोत्याखाली आहेत़ जोत्याखालील प्रकल्पात एकूण ३४ दलघमी (क्षमतेच्या १७ टक्केच) पाणी शिल्लक आहे़ शिवाय, लघु प्रकल्पांची संख्या २०५ असून त्यात ११ टक्केच पाणी उपलब्ध आहे़ यातील तब्बल १३२ प्रकल्प कोरडे आहेत़ ५८ प्रकल्पातील साठा जोत्याखाली गेला आहे़
बीड जिल्हा अजूनही कोरडा
राज्यातील मुंबईसह काही विभागांमध्ये पावसाने थैमान घातलेले असताना बीड जिल्हा अजूनही कोरडा आहे. ऐन पावसाळ्यात जवळपास ७९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, सर्व १४४ प्रकल्पांपैकी १०३ कोरडेठाक आहेत. इतर प्रकल्प जोत्याखाली असल्यामुळे नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा फक्त २० टक्के पाऊस झाला आहे. ग्रामीण भागात ६९५ तर शहरी भागात १०० टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. पुरेसा चारा उपलब्ध झालेला नसल्यामुळे ४४ चारा छावण्या अजूनही सुरु आहेत. जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा हे दोन मोठे प्रकल्प मृतसाठ्यात आहेत. मध्यम १६ प्रकल्पांपैकी ७ जोत्याखाली तर ८ कोरडे आहेत. लघु प्रकल्पांची संख्या १२६ असून त्यापैकी ८ हे २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत. २३ जोत्याखाली असून ९५ प्रकल्प कोरडे आहेत.
जायकवाडीचे दरवाजे उघडा
जायकवाडी धरणाचे दरवाजे पाणी माजलगाव धरण क्षेत्रात कालव्याद्वारे घेता येते. जायकवाडीचे पाणी माजलगाव प्रकल्पात सोडावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या संदर्भात बीड नगरपालिका व माजलगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांकडे तो पाठवला जाईल, अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी दिली.
जालन्यात ३७ तलाव कोरडेठाक
अर्धा पावसाळा संपला असताना जिल्ह्यात सरासरीच्या २५० मिलिमीटर एवढा कमी पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा तो ३५ टक्क्यांनी कमी आहे. बुधवारी परतूर आणि भोकरदन तालुक्यांतील पारध व परिसरात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यातील ५७ लघु प्रकल्पांपैकी ३७ तलाव कोरडेठाक असून, सात मध्यम प्रकल्पांपैकी भोकरदन तालुक्यातील जुई आणि धामणा प्रकल्प भरले आहेत. पाच प्रकल्पांमध्ये जेमतेम साठा शिल्लक आहे. जालना जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ६८८ मिलिमीटर एवढी आहे. ३१ जुलैला टँकर पुरविण्याचे कंत्राट संपले होते; परंतु नंतर पुन्हा जिल्हा प्रशासनाकडे जवळपास १०५ गावांमध्ये टँकर सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे सादर करण्यात आला आहे. लघु पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती नुसार जालन्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ८.१३ टक्के पाणीसाठा असून, ५७ लघु प्रकल्पांमध्ये १.२२ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून केवळ ३.२२ टक्के पाणीसाठा आहे.
औरंगाबाद प्रकल्पांत अत्यल्प पाणी
जिल्ह्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे. जायकवाडी धरणात जरी मोठ्या विसर्गाने पाणी येत असले तरी धरण क्षेत्रात काल दिवसभरात फक्त ५ मि. मी. पाऊस झाला आहे. आजवर ४२.६९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ६७५.४६ मि.मी. इतकी वार्षिक सरासरी असताना जिल्ह्यात दोन महिन्यांत २८८.३७ मि. मी. पाऊस झाला आहे. ३८७ मि. मी. पावसाची अजून अपेक्षा आहे. आजवर झालेल्या पावसाच्या तुलनेत ८ आॅगस्टपर्यंत ३३७.१४ मि. मी. पाऊस होणे अपेक्षित होते. ४९ मि. मी. पावसाची अजून तूट आहे. सिल्लोड, सोयगाव, वैजापूर आणि फुलंब्री तालुक्यात ५० मि.मी.पर्यंत पाऊस झाला आहे. पैठण आणि गंगापूरमध्ये सर्वाधिक कमी पाऊस आहे. ३० मि. मी. पर्यंतही पाऊस गेला नाही. जायकवाडी धरणात ६० टक्के पाणी सध्या आहे. धरण क्षेत्रातील पावसाचे ते पाणी नाही, ते वरील धरणांच्या विसर्गामुळे संकलित झाले आहे.
नांदेड २२.६६ टक्के पाऊस; प्रमुख प्रकल्पांत ठणठणाट
७ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत नांदेड जिल्ह्यात सरासरी २२़६६ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ जिल्ह्यात आजपर्यंत ४३़५२ टक्के पाऊस पडला़ जिल्ह्यातील विष्णूपुरी, दिग्रस, अप्पर मानार आदी प्रकल्पांत अद्यापही शून्य टक्के साठा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न चिंतेचा बनत आहे़ जिल्ह्यातील (कंसात एकूण पाऊस) नांदेड ३९़६७ मि.मी. (३९८़६० मि.मी. ), मुदखेड ४८़६७ (४६७़३५), अर्धापूर १८़३३ (३७७़३०), भोकर ५२़२५ (४५३़९५), उमरी ३५ (३९८़७७), कंधार ५़८३ (३५३़६६), लोहा १५़१७ (३१४़६५), किनवट १३़५७ (५९५़६७), माहूर २़२५ (५७३़३४), हदगाव ९़१४ (४२६़२८), हिमायतनगर १० (४९५़३५), देगलूर १३़६७ (२५८़४९), बिलोली १४ (४३८), धर्माबाद ४८़३३ (४०८़९८), नायगाव १५ (३८९़०), मुखेड २१़७१ मि.मी. (३३३़११)़ पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत १३४३़३८ मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे. ६ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार, सिद्धेश्वर, दिग्रस, अंतेश्वर, विष्णूपुरी, अप्पर मानार प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे़ लोअर मानार प्रकल्पात १२़५०, इसापूर प्रकल्पात १०़१४, आमदुरा बॅरेज ६६़०८, बळेगाव बॅरेजमध्ये १७़१९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणाच्या जलसाठ्यात दर तासाला एक टक्क्याने भर पडली https://t.co/ag3D3soQf5
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 7, 2019
परभणी सर्व प्रकल्प कोरडेठाक
गुरुवारी रात्री परभणीसह गंगाखेड, पालम आणि सोनपेठ तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे़ त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत. श्रावण महिन्यात जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस होत आहे़ जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. असून, आजपर्यंत सरासरी २४४़१६ मि.मी. पाऊस झाला़ गंगाखेड आणि पालम तालुक्यात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ परभणी शहर, सोनपेठ तालुक्यात सायंकाळनंतर मध्यम पाऊस झाला़ जिल्ह्यात येलदरी आणि निम्न दूधना हे दोन मोठे प्रकल्प असून, करपरा व मासोळी हे मध्यम प्रकल्प आहेत़ त्याचप्रमाणे २२ लघु तलाव आहेत़ चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे केवळ ०़७२ टक्के जलसाठा प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिला आहे़ यातील एकही प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर आला नाही़ येलदरी प्रकल्पात सध्या ४४६़१४० मीटर पाणी पातळी आहे़ या धरणात मागील २४ तासांत ०़२२३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे़ १ जूनपासून आतापर्यंत १४़१६ दलघमी पाण्याची आवक झाली असली तरी हे धरण अजूनही मृतसाठ्यात आहे़ जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्प मृतसाठ्यात आहेत़ २२ लघु प्रकल्पांत ४२ दघलमी पाणीसाठा होतो़ मात्र या लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला ०़६५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.
लातूर जिल्ह्यातील प्रकल्प कोरडेच
जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत २४३़९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे़. शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात केवळ ६़८४२ दलघमी, तर तेरणा प्रकल्पात १४़७५४ दलघमी पाणीसाठा आहे़ पावसाची वार्षिक सरासरी ८०२ मि.मी. आहे़ जून ते आॅगस्ट महिन्यांत अपेक्षित पावसाची सरासरी ३५६ मि.मी. असताना २४३ मि.मी. पाऊस झाला. मांजरा, तेरणासह आठ मध्यम, १३२ लघु प्रकल्पकोरडेठाक आहेत. एकाही मध्यम वा लघु प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा नाही. लातूर तालुक्यातील तावरजा, रेणापूर तालुक्यातील रेणा, व्हटी प्रकल्पात शून्य टक्के पाणीपुरवठा आहे़ तर उदगीर तालुक्यातील तिरु २़२८०, देवर्जन १़७३१, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ १़६८०, घरणी १़५३३ तर निलंगा तालुक्यातील मसलगा प्रकल्पात केवळ ०़०४५ दलघमी पाणीसाठा आहे़ यापैकी देवर्जन प्रकल्पात केवळ ०़२१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 243मि.मी. पाऊस ०़१२ टक्का पाणीसाठा.