औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:22 AM2020-05-08T10:22:56+5:302020-05-08T11:30:32+5:30
या भीषण रेल्वे अपघातातून बचावलेल्या दोनपैकी एका मजुरानं सगळा घटनाक्रमच सांगितला.
औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाना परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. या १४ जणांचा जागेवर मृत्यू झाला, दोघांचा 2 उपचाराला नेताना मृत्यू झाला आणि 3 जखमी आहेत, यातील एकाने ही माहिती दिली आहे. या भीषण रेल्वे अपघातातून बचावलेल्या तीनपैकी एका मजुरानं सगळा घटनाक्रमच सांगितला.
कशा पद्धतीनं रेल्वेनं त्याच्या सहकाऱ्यांना चिरडलं, याची माहिती त्यानं दिली आहे. तो म्हणाला, चालून चालून आम्ही थकलो होतो. पाणी प्यायलो आणि म्हटलं थोडा वेळ आराम करावा. त्याचदरम्यान रेल्वे रुळावर असतानाच थोडी धुंदी आली आणि डोळा लागला. त्यानंतर समोरून कधी ट्रेन आली ते समजलंच नाही आणि माझ्या सहकाऱ्यांना चिरडून टाकलं. ट्रेन आल्याचं आम्हाला कोणालाही समजलं नाही. आमचा डोळा लागला होता. आम्ही सर्व १९ मजूर होतो. सर्व मजूर मध्य प्रदेशातीलच होते. पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील होते, असंही त्यानं सांगितलं आहे.
आम्ही काका आणि पुतणे या अपघातातून वाचलो आहोत. माझ्या पुतण्याचं वय १९ वर्षं असून, माझं वय २१ वर्षं आहे. आम्ही जानेवारीमध्ये येथे आलो होतो. आई, बायको आणि दोन छोटी छोटी मुलं घरी एकटीच आहेत, म्हणून तिकडे जायचं होतं. औरंगाबादवरून बस किंवा ट्रक मिळेल, या उद्देशानं आम्ही आलो होतो. काल संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान आम्ही तिकडून निघालो होतो. काही ठिकाणी मध्ये थांबून एक एक चपाती खाल्ली होती आणि इतर चपात्या पुढच्या प्रवासासाठी ठेवल्या होत्या. परंतु काळानंच आमच्यावर घाला घातला, अशा भावनाही त्या मजुरानं व्यक्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. धर्मेंद्र सिंह(२०), ब्रिजेंद्र सिंह(२०), निर्बेश सिंह (२०), धन सिंह (२५), प्रदीप सिंह, राज भवन, शिव दयाल, नेमसहाय सिंह, मुनिम सिंह, बुधराज सिंह, अचेलाल, रविंद्र सिंह या मजुरांचा दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार
'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'
Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार
Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित